डाळींब बाग केली पोपटांनी फस्त
By Admin | Updated: May 22, 2016 01:55 IST2016-05-22T01:55:48+5:302016-05-22T01:55:48+5:30
शेती करण्याची नवी ऊर्जा घेऊन पारंपरिक पिकांपासून फारकत घेत फळबागेकडे वळलेल्या युवा शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

डाळींब बाग केली पोपटांनी फस्त
लाखोंचे नुकसान : तीन वर्षांचे श्रम ठरले व्यर्थ
घोराड : शेती करण्याची नवी ऊर्जा घेऊन पारंपरिक पिकांपासून फारकत घेत फळबागेकडे वळलेल्या युवा शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. उत्पन्न हातात येण्याची वेळ आली असताना पोपटांनी डाळींबातील गरे खात झाडाला टरफल ठेवले. या प्रकारामुळे युवा शेतकरी हतबल झाला आहे.
हिंगणी येथील अजय डेकाटे या युवकाने अभियांत्रिकी पदविका घेतल्यानंतर शेतीतून अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी नाविन्यपूर्ण शेती करण्याचे ठरविले. यासाठी त्याने डाळींबाची फळबाग २०१३ मध्ये लावली. येथून तीन वर्षांनी हातात उत्पन्न येईल, ही अपेक्षा होती. फळबाग फुलली. तीन एकरांत ८०० डाळींबाची झाडे लावली. त्या प्रत्येक झाडाला ७० ते ७५ डाळींब लागले. एका डाळींबाचे वजन ७०० ते ८०० ग्रॅम होते. आजचा बाजारभाव पाहता एक डाळींब ८० ते ९० रुपयांत विकले गेले असते; पण ऐन डाळींब तोडणीची वेळ आली आणि पोपटाच्या थव्यांनी या डाळींब बागेवर बस्तान बसविले. या पोपटांनी शेतकऱ्याला मिळणाऱ्या १५ ते १७ लाखांच्या उत्पन्नावर घाला घातला. डाळींबातील गरे फक्त केली अन टरफले झाडाला ठेवली. नापिकी व कर्जबाजारीपणापासून मुक्तता मिळावी म्हणून निवडलेला मार्गही खडतर झाल्याचे दुख: उराशी बाळगून शासकीय यंत्रणेकडे मदतीसाठी धाव घेतली. वनविभाग, जिल्हाधिकारी, कृषी विभागाला निवेदन दिली. गत आठ दिवसांपासून हा युवा शेतकरी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहे. ही फळबाग स्व-खर्चाने लावलेली असल्याने पहिल्याच उत्पन्नाच्या आशेवर पोपटांनी पाणी फेरले. या शेतकऱ्याच्या पाठोपाठ अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहे. कृषी विभाग तसेच मनरेगातून अनेकांनी फळबागा लावल्या; पण अशी संकटे आल्यास फळाचे संगोपण व रक्षण कसे करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे शासनाने या शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)