आजी-माजी आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला
By Admin | Updated: October 30, 2015 02:38 IST2015-10-30T02:38:55+5:302015-10-30T02:38:55+5:30
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या शूरविरांच्या स्मृती कायम तेवत राहव्या म्हणून आष्टी तालुक्याची निर्मिती झाली. शासनाने आता नगर पंचायतीचा दर्जा दिला.

आजी-माजी आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला
नगर पंचायत निवडणूक: निष्ठावंतांना डावल्याने काँग्रेसमध्ये बंडखोरी
सुरेश बद्रे/अमोल सोटे आष्टी (शहीद)
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या शूरविरांच्या स्मृती कायम तेवत राहव्या म्हणून आष्टी तालुक्याची निर्मिती झाली. शासनाने आता नगर पंचायतीचा दर्जा दिला. त्याची पहिलीवहिली निवडणूक १ नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी प्रचाराला वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारात व्यस्त असले तरी आजी-माजी आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
एकूण १७ जागांसाठी तब्बल ७५ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस १७, भाजपा १७, जनशक्ती पार्टी १२, शिवसेना ११, राष्ट्रवादी काँग्रेस ३, माकपा १, बसपा १, अपक्ष १३ असे उमेदवार आहे. या उमेदवारांचे भवितव्य ४ हजार ४१२ पुरुष व ४ हजार ५७ महिला अशा एकूण ८ हजार ४६९ मतदारांच्या हाती आहेत. मतदार संख्या कमी आणि वॉर्ड लहान असल्यामुळे ‘डोअर टु डोअर’ प्रचारावर सर्वच राजकीय पक्षांचा भर आहे. यावेळी निवडणुकीत विकासाचा मुद्दा प्रामुख्याने रेटला जात आहे. मतदार जागरूक झाला आहे. एकदा केलेले मतदान पाच वर्ष विकासाला महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. याची चर्चा मतदार करताना दिसून येते. यावेळी जुन्या फळीमधील कार्यकर्त्यांना तिकिट वाटपात डावलल्याने काँग्रेस पक्षांतर्गत नाराजीचा सूर आहे. काँग्रेसला याची सर्वाधिक झळ बसण्याची शक्यता आहे. बंडखोरांचे काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. आर्वी विधानसभा मतदार संघाचे आमदार अमर काळे यांनी आपल्या काँग्रेसच्या उमेदवारांसाठी चांगलीच कंबर कसली आहे. विकासाचा मुद्दा पुढे करुन ते मते मागत असले तरी बंडोबांचे आव्हान ते कसे पेलवतील, याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रथमच जनशक्ती पार्टीने आपले उमेदवार उभे केले आहे. त्यांनीही प्रचारात चांगलीच मजल मारली आहे. जनशक्ती पार्टीच्या प्रचारात मकेश देशमुख व त्यांचे कार्यकर्ते भिडले आहे. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने त्यांच्याही प्रचाराला चांगलीच गती आल्याचे दिसत आहे. उल्लेखनीय, त्यांच्याकडून उमेदवार कसा असावा, यावर प्रचाररुपी प्रबोधनच सुरू असल्याचे दिसून येते. शिवसेनेची धुरा निलेश देशमुख यांच्यावर आहे. भाजपाने यावेळी अत्यंत चौकसबुद्धीने उमेदवारी बहाल केल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार दादाराव केचे हे मागील दोन महिन्यांपासून मतदारांशी प्रत्यक्ष भेटीगाठी करताना दिसून येत असून ते सध्या आष्टीत तळ ठोकून आहे. आष्टीला उभे केलेले ग्रामीण रूग्णालय, पंचायत समिती इमारत, अंतर्गत रस्ते तसेच पालकमंत्र्याकडून मंजूर करून घेतलेले पाच कोटी रूपये विकासासाठी कसे खर्ची लावणार हे मतदारांना पटवून देत मतांचा जोगवा मागत आहे. यात ते कितपत यशस्वी होतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. प्रत्येकजण विकासाच्या बाता करीत असले तरी मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकतो, हे निकालानंतरच कळेल.
चार वॉर्डात त्रिकोणी लढत
प्रभाग १ मध्ये ४, प्रभाग २ मध्ये ६, प्रभाग ३ मध्ये ४, प्रभाग ४ मध्ये ४, प्रभाग ५ मध्ये ४, प्रभाग ६ मध्ये ५, प्रभाग ७ मध्ये ४, प्रभाग ८ मध्ये ४, प्रभाग ९ मध्ये ५, प्रभाग १० मध्ये ३, प्रभाग ११ मध्ये ३, प्रभाग १२ मध्ये ३, प्रभाग १३ मध्ये ७, प्रभाग १४ मध्ये ३, प्रभाग १५ मध्ये ५, प्रभाग १६ मध्ये ५ व प्रभाग १७ मध्ये ५ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहे. यातील प्रभाग १०, ११, १२, १४ मध्ये प्रत्येकी तीन उमेदवार असल्याने येथे त्रिकोणी लढतीचा, तर अन्य वॉर्डात बहुरंगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत.