राष्ट्रीय सणाला होणाऱ्यां ग्रामसभा ठरतात राजकीय आखाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:16 IST2018-01-24T00:16:04+5:302018-01-24T00:16:36+5:30
गणतंत्र दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यात सर्वच ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात येतात. गावविकासाकरिता या ग्रामसभा महत्त्वाच्या असल्या तरी गावात वाढत असलेल्या आपसी राजकारणामुळे या ग्रामसभा राजकीय आखाडे बनतात.

राष्ट्रीय सणाला होणाऱ्यां ग्रामसभा ठरतात राजकीय आखाडा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गणतंत्र दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यात सर्वच ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात येतात. गावविकासाकरिता या ग्रामसभा महत्त्वाच्या असल्या तरी गावात वाढत असलेल्या आपसी राजकारणामुळे या ग्रामसभा राजकीय आखाडे बनतात. राष्ट्रीय सण म्हणून ओळख असलेल्या या दिवसात गावाच्या विकासाकरिता झटणाऱ्या शासनाच्या कर्मचाऱ्यांवर विनाकारण मानहाणी होण्याची नामुष्की ओढवत असल्याने या दिवसाला होणाºया सभा रद्द कराव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसवेक युनियनन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाºयांना केली आहे.
याच वेळी ग्रामपंचायतीच्या कामाव्यतिरिक्त इतर कामाच्या ताण वाढल्याने कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती खालावत आहे. राज्यात गत दोन वर्षांत अनेक ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्या आहेत. शेकडो ग्रामसेवकांचे अपघात झाले आहेत. यामुळे ग्रामसेवकांवर टाकण्यात आलेल्या अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्याच्या मागणीकरिता बुधवारी संपुर्ण राज्यात मुकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे. वर्धेतही असा मोर्चा आयोजित करण्यात येणार असून या मोर्चात जिल्ह्यातील ग्रामसवेक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर धडकणार असल्याचे संघटनेने कळविले आहे.
वर्धेलगतची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीअंतर्गत कारला येथे २६ जानेवारी २०१६ रोजी एका नागरिकाने ग्रामसचिवाच्या अंगावर रॉकेल फेकत स्वत:ही जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.