देशभक्तीच्या भावनेने कर्तव्य बजावणारे पोलीस महान
By Admin | Updated: October 23, 2016 02:25 IST2016-10-23T02:25:09+5:302016-10-23T02:25:09+5:30
जीवाची पर्वा न करता देशभक्तीच्या भावनेने कर्तव्य बजावणारे पोलीस महानच आहे. आपले कर्तव्य पार पाडताना देशवासियांना सुरक्षित आयुष्य जगता यावे,

देशभक्तीच्या भावनेने कर्तव्य बजावणारे पोलीस महान
ध्यानी : शहीद नितीन पुट्टेवार स्मृतीदिन कार्यक्रम
हिंगणघाट : जीवाची पर्वा न करता देशभक्तीच्या भावनेने कर्तव्य बजावणारे पोलीस महानच आहे. आपले कर्तव्य पार पाडताना देशवासियांना सुरक्षित आयुष्य जगता यावे, यासाठीच प्राण वेचले, हे लक्षात घेता त्यांना आदरांजली वाहणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे मत केंद्रीय राखीव दल पोलीस नागपूर विभागाचे समादेशक ध्यानी यांनी व्यक्त केले.
भारत माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात शहीद नितीन पुट्टेवार पोलीस स्मृतीदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मंचावर प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन संस्थेचे सचिव धारकर, पोलीस निरीक्षक साळवी, नगरसेविका शारदा पटेल, मुख्याध्यापिका मोरे, उपमुख्या. बुरिले, पर्यवेक्षिका घोडवैद्य आदी उपस्थित होते. पोलीस दिवसाची माहिती देताना ध्यानी पूढे म्हणाले की, १९५० ला जम्मु-काश्मिरमधील लद्दाख येथे चीन या देशाला लागून असलेल्या सिमेची सुरक्षा करताना १० पोलीस शिपाई यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हापासून २१ आॅक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो.
याप्रसंगी शहीद नितीन पुट्टेवार यांच्या मातोश्री प्रतीभा पुट्टेवार यांचा ध्यानी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रतीभा पुट्टेवार यांनी या विद्यालयातून असे शुरवीर तयार व्हावे, अशी मनोकामना व्यक्त केली. धारकर यांनी आपले शिपाई सदैव जागृत राहतात, म्हणून आपण सुरक्षित आहोत. आपणही आपल्या मातृभूमीबाबत विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांना देशभक्ती, राष्ट्रप्रेम जागृतीसाठी प्रेरणा दिली पाहिजे, असे सांगितले. मुख्या. मोरे यांनी प्रास्तविक केले. शहीद नितीन पुट्टेवार यांच्याबबात माहिती देताना तो भारत विद्यालयाचा विद्यार्थी होता, ही अभिमानास्पद बाब आहे, असे सांगितले. साळवी, नगरसेविका पटेल यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन धात्रक यांनी केले तर आभार बुरीले यांनी मानले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)