चोरीच्या वाहनांवर पोलिसांचा वॉच
By Admin | Updated: May 21, 2016 02:11 IST2016-05-21T02:11:19+5:302016-05-21T02:11:19+5:30
गत काही दिवसात शहरात दुचाकी वाहने चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या धर्तीवर वर्धा शहर ठाण्याच्यावतीने आरती चौक परिसरात नाकाबंदी करीत वाहन तपासणी मोहीम राबविली.

चोरीच्या वाहनांवर पोलिसांचा वॉच
शहर पोलिसांची नाकाबंदी : वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने मोहीम
वर्धा : गत काही दिवसात शहरात दुचाकी वाहने चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या धर्तीवर वर्धा शहर ठाण्याच्यावतीने आरती चौक परिसरात नाकाबंदी करीत वाहन तपासणी मोहीम राबविली. चोरीच्या वाहनांचा सुगावा लागावा यासाठी सदर मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या काही वर्षात जिल्ह्यात वाहनाची संख्या अनेक पटीने वाढली आहे. तसेच वर्धा शहरातून नागपूर, यवतमाळ आदी जिल्ह्यात दुचाकीने नियमित ये-जा करीत असलेल्यांनी संख्याही बरीच आहे. विशेष म्हणजे या काही महिन्यात दुचाकी वाहने चोरीस जात असल्याच्या अनेक घटना शहर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आल्या आहे. यातील बऱ्याच दुचाकी या दारूची वाहतूक करण्यासाठी वापरात येत असल्याचेही वास्तव पुढे येत आहे. दुचाकी जप्त केल्यावर बरेचदा ती चोरीची असल्याचे निदर्शनास येते. तसेच शहरातही इतरत्र वाहने चोरी जात असल्याचे सत्र सुरू झाले आहे. या सर्वांवर आळा घालण्यासाठी वर्धा शहर पोलिसांच्या वतीने शुक्रवारी आरती चौक परिसरात वाहन तपासणी मोहीम नाकाबंदी करून राबविण्यात आली. यामध्ये वाहन अडवून कागदपत्रे वाहनांचे नंबर आदींची तपासणी करण्यात आली. दिवसभर ही मोहीम सुरू असल्याने नागरिकांना ही मनस्ताप केला. या मोहीमेत शेकडो गाड्यांची तपासणी केली.(शहर प्रतिनिधी)
आरोपीच्या अटकेसाठी नाकाबंदी ?
अमरावतीतून दुचाकी चोरी प्रकरणातील कुख्यात आरोपी फरार झाला.तो नागपुरातील आहे. तो वर्धा मार्गे पळून जाऊू नये, यासाठी वर्धा शहर पोलिसांनी आरती चौकात ही नाकाबंदी केली असल्याची माहिती पोलीस सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. शहरचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी दुचाकी चोरांवर पाळत सुरु असल्याचे सांगून दुजोरा दिला.