आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांना हेलपाटे
By Admin | Updated: August 20, 2014 23:41 IST2014-08-20T23:41:24+5:302014-08-20T23:41:24+5:30
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सध्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे़ आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनाही हेलपाटे मारावे लागत आहेत़ रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी मनमानी

आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांना हेलपाटे
रुग्णालयात अनागोंदी : रुग्णांची होतेय हेळसांड; वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सेलू : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सध्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे़ आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनाही हेलपाटे मारावे लागत आहेत़ रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी मनमानी कारभार करीत असल्याने रुग्ण त्रस्त झाले आहेत. आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
अनेक प्रकरणांत आरोपी वा फियादीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलीस त्यांना ग्रामीण रुग्णालयात घेऊन जातात. काही डॉक्टर वैद्यकीय तपासणी न करता व सबळ असे काहीही कारण न सांगता उद्धटासारखी वागणूक देत पोलिसांना परत पाठवितात़ पोलीस यंत्रणेने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या वागणुकीबाबत रोष व्यक्त केला़
१४ आॅगस्ट रोजी शांताराम भानसे, बाभुळगाव यांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता पोलिसांना उद्या या, असे सांगून परत पाठविले. दुसऱ्या दिवशी पोलीस कर्मचारी त्या आरोपीला घेऊन गेले असता त्याला पुन्हा परत पाठविले़ पोलीस कर्मचाऱ्याने ही बाब ठाणेदार उल्हास भुसारी यांना सांगितली. यामुळे ठाणेदार स्वत: त्या आरोपीला घेऊन रुग्णालयात गेले. पोलिसांकरिता हा अनुभव नित्याचाच आहे.
या रुग्णालयात शवविच्छेदनाची व्यवस्था असताना अनेकदा स्वीपर नसल्याचे कारण पुढे करून डॉक्टर शवविच्छेदनास टाळाटाळ करतात. हा अनुभव मृतकांच्या नातलगांना आला आहे. काही प्रकरणांत पोलिसांना आरोपी वा फिर्यादीची वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय पुढील सोपस्कार करता येत नाहीत़ डॉक्टरांनी जर अशा गंभीर प्रकरणी टाळाटाळ केली तर सर्वसामान्य अन्यायग्रस्तांना न्याय कसा मिळणार, हा प्रश्नच आहे़ जिल्हा आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)