कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण; पण वर्धा, पुलगावात बसेस ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST2021-12-11T05:00:00+5:302021-12-11T05:00:12+5:30
दिवाळी पूर्वी रामपच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. मध्यंतरी काही कर्मचारी कर्तव्यावर आले तरी अजूनही काही कर्मचारी विलीनीकरणासाठी लढा देत आहेत. या आंदोलनामुळे रापमची प्रवासी वाहतूक सेवा विस्कळली आहे. शुक्रवारी वर्धा व पुलगाव येथे बसेस आगारात होत्या. तर हिंगणघाट आगारातून दोन, तळेगाव आगारातून एक, आर्वी आगारातून सहा बसेस सोडण्यात आल्या आहेत.

कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण; पण वर्धा, पुलगावात बसेस ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रापमचे जे कर्मचारी कर्तव्यावर रुजू होत आहेत. त्यांना पोलीस संरक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे पोलीस संरक्षणातच प्रवाशांसाठी बसेस सोडल्या जात असल्या तरी जिल्ह्यातील रापमच्या पाच पैकी वर्धा व पुलगाव या दोन आगारांत सध्या बसेस उभ्या आहेत, तर काही कर्मचारी कर्तव्यावर आल्याने शुक्रवारी हिंगणघाट, आर्वी व तळेगाव आगारातून बोटावर मोजण्या इतक्याच बसेस सोडण्यात आल्या. दिवाळी पूर्वी रामपच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. मध्यंतरी काही कर्मचारी कर्तव्यावर आले तरी अजूनही काही कर्मचारी विलीनीकरणासाठी लढा देत आहेत. या आंदोलनामुळे रापमची प्रवासी वाहतूक सेवा विस्कळली आहे. शुक्रवारी वर्धा व पुलगाव येथे बसेस आगारात होत्या. तर हिंगणघाट आगारातून दोन, तळेगाव आगारातून एक, आर्वी आगारातून सहा बसेस सोडण्यात आल्या आहेत.
०३ बसेसवर झाली दगडफेक
- काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने बाेटावर मोजण्या इतक्या बसेस प्रवाशांसाठी सोडल्या जात आहेत. असे असले तरी प्रवाशांसाठी सोडण्यात आलेल्या तीन बसेसवर आतापर्यंत दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे रापमचे मोठ्या नुकसान झाले आहे.
- वारंवार आवाहन करूनही कर्तव्यावर रुजू न झाल्याने तब्बल २१९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात कामयस्वरूपी १५८ कर्मचारी असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर ६१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे.
सुरक्षित प्रवास लालपरीचाच
रापम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बसेस बंद आहेत. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांनी ये-जा करावी लागत आहे. असे असले तरी सुरक्षित प्रवास अशीच रापमच्या लालपरीची ओळख आहे. बसेस लवकर सुरू व्हायला पाहिजेत.
- दिनेेश भोंगाडे, प्रवासी.
रापम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे खासगी प्रवासी वाहतुकीला उधाण आले आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणारे क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांचा वाहनात भरणा करतात. त्यामुळे हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. रापमच्या बसचा प्रवास हा सुरक्षित आहे, पण सध्या बसेस बंद आहे. बसेस लवकरात लवकर सुरू व्हायला हव्यात.
- विलास घुडे, प्रवासी.
काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने शुक्रवारी हिंगणघाट, तळेगाव तसेच आर्वी या आगारामधून एकूण नऊ बसेस सोडण्यात आल्या आहेत, तर वर्धा आणि पुलगाव आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही.
- चेतन हसबनीस, विभाग नियंत्रणक, रापम, वर्धा.