‘थर्टी फर्स्ट’वर पोलिसांची करडी नजर
By Admin | Updated: December 23, 2014 23:08 IST2014-12-23T23:08:14+5:302014-12-23T23:08:14+5:30
थर्टीफर्स्टला दारू पिऊन कुठे धिंगा घालाल तर सावधान. शिवाय दारूच्या नशेत वाहन चालविणेही महागात पडणार आहे. ३१ डिसेंबर रोजी शहरात वा जिल्ह्यात अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता

‘थर्टी फर्स्ट’वर पोलिसांची करडी नजर
वर्धा : थर्टीफर्स्टला दारू पिऊन कुठे धिंगा घालाल तर सावधान. शिवाय दारूच्या नशेत वाहन चालविणेही महागात पडणार आहे. ३१ डिसेंबर रोजी शहरात वा जिल्ह्यात अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत पोलिसांनी कंबर कसली आहे. या दिवशी दारू ढोसणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्याकरिता ठिकठिकाणी जल्लोष असतो. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी या दिवशी मोठ्या प्रामणात दारू शहरात येते व ती शौकिणांपर्यत पोहोचतेही. शहरातील हॉटेल्स व धाब्यांचा मद्य प्राशनाकरिता वापर होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. यावर आळा घालण्याकरिता या हॉटेल्स मालकांना नोटीसी बजावण्यात आल्या आहे. या हॉटेलात मद्य प्राशन दुचाकीने येत शहरात हुल्लड करणारेही अधिक असतात. परिणामी अपघाताची शक्यता बळावते. मद्यधुंदीत वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
कारवाईकरिता जिल्ह्यात असलेल्या विशेष दारूबंदी पथकाच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. जिल्ह्यात दारूबंदी करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या पथकात एकूण ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्थितीत शहरात दारू येणार नाही व मद्यधुंदीत कोणता अपघात घडणार नाही याकरिता कारवाई करण्याची ताकीद जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या दिवसाला सतर्कता म्हणून रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर करडीनजर ठेवण्यासह पर्यटन स्थळ परिसरातही गस्त करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)