मोहनच्या थापांपुढे पोलीस हैराण
By Admin | Updated: August 19, 2015 02:18 IST2015-08-19T02:18:56+5:302015-08-19T02:18:56+5:30
चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून तिचे तुकडे करणारा मोहन वरठी पोलिसांना चांगलाच फिरवित आहे.

मोहनच्या थापांपुढे पोलीस हैराण
वर्धा : चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून तिचे तुकडे करणारा मोहन वरठी पोलिसांना चांगलाच फिरवित आहे. त्याला विचारणा करण्यात येत असून तो घटनास्थळ दाखविण्याच्या नावावर केवळ सैर करीत असल्याचे दिसून आले आहे. मोहनला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून विचारणा सुरू आहे; मात्र त्याच्याकडून आवश्यक असलेली माहिती वदविने सेवाग्राम पोलिसांना शक्य झाले नसल्याचे दिसते.
मोहनकडून हत्येच्या कबुली व्यतिरिक्त पोलिसांच्या हाती काहीच आले नाही. त्याने मंगलाची हत्या कुठे केली, शिवाय त्याच्या सांगण्यानुसार हत्येकरिता वापरलेली कुऱ्हाड त्याने कुठे ठेवली, हत्येच्या वेळी तो एकटा होता वा त्याच्या सोबत आणखी कोणी होते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून काढण्यास पोलीस असमर्थ ठरत असल्याचे दिसून आले आहे. त्याच्याकडून तपासात काही उघड करणे सेवाग्राम पोलिसांना अवघड होत असल्यामुळे या तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सहभागी करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्यात घडलेल्या मोठमोठ्या गुन्ह्याचा उलगडा करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही सध्या तरी या प्रकरणात यश आले नसल्याचे दिसून आले आहे.
घटनास्थळ दाखविण्याच्या नावावर मोहन केवळ पोलिसांच्या वाहनात फिरून सैर करीत असल्याचे दिसत आहे. त्याच्याकडून हत्येच्या विविध पैलूंचा उलगडा करण्यात वर्धा पोलीस सध्या तरी अपयशी ठरत असल्याचे दिसून आले आहे. मोहन याने ज्या पद्धतीने मंगलाची हत्या केली यावरून तो किती क्रूर व निगरगट्ट असावा याचा अंदाज पोलिसांना आला आहे. अशात त्याच्याकडून कुठलीही माहिती मिळत नसल्याने पोलिसांच्या तपासात सध्या तरी काहीच हाती नसल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)