पोलिसांकडून दारूभट्ट्या उद्ध्वस्त
By Admin | Updated: June 14, 2015 02:21 IST2015-06-14T02:21:33+5:302015-06-14T02:21:33+5:30
जिल्ह्यातील दारूबंदी कडक करण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यात शनिवारी पहाटे आनंदनगर व पुलफैल ...

पोलिसांकडून दारूभट्ट्या उद्ध्वस्त
वर्धा : जिल्ह्यातील दारूबंदी कडक करण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यात शनिवारी पहाटे आनंदनगर व पुलफैल परिसरात केलेल्या कारवाईत गावठी दारू गाळण्याकरिता लावण्यात आलेल्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. यात एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा दारूसाठा नष्ट करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने तिथे वर्धेतून दारूचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी कडक करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत मोहीम राबविण्यात येत आहे. यात वर्धा शहर ठाण्याच्यावतीने आनंदनगर व पुलफैल भागात मोहीम राबविण्यात आली. पहाटे ५ वाजताच्या सुमारास राबविण्यात आलेल्या या मोहिमेत दारूसाठा नष्ट करण्यात आला.
यात प्लास्टीकसह लोखंडी अशा एकूण ७९ ड्रममधील गावठी दारूसाठा व साहित्य जप्त नष्ट करण्यात आले. दारूभट्टी चालविणाऱ्यांवर दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला. गत महिन्यापासून अशी मोहीम सुरू असताना दारूच्या भट्ट्या नष्ट होताना दिसत नाही. यामुळे पोलिसांच्या कारवाईवर संशय निर्माण होत आहे.(प्रतिनिधी)