लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला अटक
By Admin | Updated: January 7, 2016 02:44 IST2016-01-07T02:44:47+5:302016-01-07T02:44:47+5:30
दारूबंदीच्या प्रकरणातून साळ्याचे नाव वगळण्यात यावे, यासाठी १० हजार रुपयांची लाच मागण्यात आली.

लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला अटक
एसीबीची कारवाई : १० हजारांची मागणी
वर्धा : दारूबंदीच्या प्रकरणातून साळ्याचे नाव वगळण्यात यावे, यासाठी १० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. या प्रकरणात स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने सेवाग्राम पोलीस ठाण्यातील दारूबंदी पथकाच्या प्रमुख पोलीस हवालदारास अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली. महेंद्र पुरूषोत्तम कांबळे (४४) असे पोलीस हवालदाराचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सेवाग्राम पोलीस ठाण्यातील दारूबंदी पथकाचे प्रमुख पोलीस हवालदार महेंद्र कांबळे याने तक्रारकर्त्यांच्या साळ्याला दारूबंदी प्रकरणातून वगळण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी १८ डिसेंबर २०१५ रोजी केली होती. याबाबत तडजोड केल्यानंतर ४ हजार रुपये देण्याची बाब तक्रारकर्त्याने मान्य केले.
या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सेवाग्राम पोलीस ठाण्यात लाच मागितल्या प्रकरणी महेंद्र कांबळे याला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजीव जैन, उपअधीक्षक स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, अनिरूद्ध पुरी, सारंग दुर्गे, पोलीस शिपाई कुणाल डांगे, पल्लवी बोबडे, श्रीधर उईके यांनी केली.
यापूर्वी ५०० रुपयांची लाच घेताना सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गिरधर पचारे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. सेवाग्राम पोलीस ठाण्यातच लाच मागण्याची दोन प्रकरणे झाल्याने तेथील कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)