पोलीस कॉलनीतील नाली व रोडचा प्रश्न धूळ खात
By Admin | Updated: November 30, 2014 23:11 IST2014-11-30T23:11:22+5:302014-11-30T23:11:22+5:30
सेवाग्रामनजीकच्या वरूड येथील पोलीस कॉलनीतील वॉर्ड क्रमांक १ मधील नाली आणि रोडच्या बांधकामाबाबत संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांना वारंवार निवेदन देण्यात आले.

पोलीस कॉलनीतील नाली व रोडचा प्रश्न धूळ खात
वर्धा : सेवाग्रामनजीकच्या वरूड येथील पोलीस कॉलनीतील वॉर्ड क्रमांक १ मधील नाली आणि रोडच्या बांधकामाबाबत संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांना वारंवार निवेदन देण्यात आले. परंतु अद्यापही याची दखल घेतली जात नसल्याने येथील नागरिकांना वारंवार मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत कामांना सुरुवात करण्याची मागणी येथील रहिवासी दशरथ पचारे यांनी केली आहे.
निवेदनानुसार वॉर्ड क्रमांक १ मध्ये अद्याप नाली आणि रोडचे बांधकाम करण्यात आलेले नाही. जवळपास तीन वर्षांपासून त्यासाठी वारंवार निवेदने देण्यात आली आहे. सर्वप्रथम यासंदर्भात ८ डिसेंबर २०११ रोजी वरूड येथील ग्रामपंचायतचे सरपंच आणि सचिवांना निवेदन देण्यात आले. नाली नसल्याने पचारे यांना सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी खड्डा खणावा लागला. यामुळे सतत डासांचा हैदोस असतो. हे निवेदन देऊनही नाली व रोडचे बांधकाम करण्यात न आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला १७ आॅगस्ट २०१३, २१ नोव्हेंबर २०१३, आणि १३ आॅगस्ट २०१४ अशी वारंवार नाली व पक्का रस्ता बांधण्यासाठी निवेदने दिली. परंतु नाली न बांधता त्यांनाच उलट ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे शोषखड्डा हा सार्वजनिक रस्त्याच्या मधात येत असल्याचे पत्र पाठवत तो बुजविण्याचे सांगण्यात आले.
या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी प्रत्यक्ष मोका तपासणी करून नाली आणि पक्क्या रस्त्याच्या बांधकामाचा प्रश्न करण्यात यावे अशी मागणी पचारे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना केली आहे. त्याचप्रकारे निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी तसेच आमदार आणि खासदारांनाही देण्यात आल्या आहे. यासदर्भात ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)