बंदोबस्तातील पोलीस मतदानापासून वंचित
By Admin | Updated: October 18, 2014 23:45 IST2014-10-18T23:45:59+5:302014-10-18T23:45:59+5:30
विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे काही महिला-पुरूष, अधिकारी, कर्मचारी मतदानापासून वंचित राहिलेत़ काही कर्मचाऱ्यांना गुरूवारी व शुक्रवारी बॅलेटपेपर प्राप्त झाले

बंदोबस्तातील पोलीस मतदानापासून वंचित
वर्धा : विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे काही महिला-पुरूष, अधिकारी, कर्मचारी मतदानापासून वंचित राहिलेत़ काही कर्मचाऱ्यांना गुरूवारी व शुक्रवारी बॅलेटपेपर प्राप्त झाले तर बहुतांश कर्मचारी ते न मिळाल्याने महदानाचा हक्क बजावू शकले नाहीत़ हे कर्मचारी अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करताना दिसतात़ यातील अधिकारी त्रूटी असल्याचे सांगत असताना निवडणूक विभागाद्वारे मात्र प्रस्ताव उशीरा प्राप्त झाल्याचे सांगितले़ यामुळे नेमकी चुक कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
जिल्हा प्रशासनात ११०० च्या वर महिला, पुरूष पोलीस कर्मचारी कार्यरत आहे़ विविध पोलीस ठाण्यांत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक बंदोबस्तासाठी नेमले होते़ या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून पोस्टल मतदानाचा अर्ज भरून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करावयाचा होता़ प्राप्त अर्जांची पडताळणी करून ते अर्ज निवडणूक विभागास सादर करण्याची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) यांच्याकडे होती़ त्यांच्या विभागातून छाननीनंतर काही अर्ज निवडणूक विभागाकडे पाठविण्यात आले तर काही अर्ज गेलेच नसल्याचे समजते़ त्या अर्जांचे गठ्ठे उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) यांच्या कार्यालयात फाईलमध्ये ठेवून असल्याची चर्चा आहे़ या संपूर्ण प्रकारामुळे बंदोबस्त पार पाडणारे अनेक महिला, पुरूष कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले़ काही कर्मचाऱ्यांना गुरूवारी व शुक्रवारी पोस्टल मतदान मतपित्रका व लिफाफा ठाण्यांत मिळाला़ तातडीने यातील कागद भरून व ज्या उमेदवाराला मत द्यायचे आहे, त्या उमेदवाराच्या चिन्हासमोर खुण करून अर्जावर ठाणेदाराची स्वाक्षरी घेऊन बंद केलेला लिफाफा सादर करायचा आहे़ ही प्रक्रिया कर्मचाऱ्यांनी पार पाडली़ ज्या कर्मचाऱ्यांनी पोस्टल अर्ज सादर केला; पण त्यांना लिफाफा आला नाही, ते मतदानापासून वंचित राहणार आहे़
प्रशासन प्रत्येक कर्मचाऱ्याने मतदान करावे, मतदानाचा हक्क बजवावा, असे फर्मान सोडतात़ जो कर्मचारी मतदान करणार नाही वा पोस्टल मतदानाकरिता अर्ज भरणार नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला़ यामुळेच कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर केले; पण त्रुटीच्या नावाखाली ते अर्ज निवडणूक विभागापर्यंत पोहोचले नाही़ यामुळे संबंधितांवर आता काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ अंदाजे ३०० कर्मचारी मतदान न करू शकल्याचे समजते़(कार्यालय प्रतिनिधी)