पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: May 15, 2015 01:55 IST2015-05-15T01:55:03+5:302015-05-15T01:55:03+5:30
दारूविक्रेत्यावर दारूबंदी कायांतर्गत कारवाई न करण्याकरिता दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सेवाग्राम ठाण्याच्या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात
वर्धा : दारूविक्रेत्यावर दारूबंदी कायांतर्गत कारवाई न करण्याकरिता दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सेवाग्राम ठाण्याच्या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास पारीसे याचा दारूचा व्यवसाय आहे. गुरुवारी सेवाग्राम ठाण्याचा शिपाई गिरीधर पचारे याने तक्रारदाराची गावठी दारू पकडली. त्याच्यावर दारूबंदी कायद्याखाली कारवाई न करण्याकरिता पचारे याने दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. यात प्रारंभी १ हजार ५०० रुपये स्वीकारले व उर्वरीत ५०० रुपये देण्यासाठी तसेच तक्रारदाराचा दारूचा व्यवसाय सुरू ठेवण्याकरिता दरमहिना एक हजार रुपयाची मागणी केली. याबाबतची तक्रार वर्धेच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. यावरून सापळा रचून गिरीधर शंकर पचारे याला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक यशवंत मतकर, पोलीस उपअधीक्षक संजय पुरदरे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे, पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावर, सारीन दुर्गे व प्रदीप देशमुख, जमादार संजय खल्लारकर, संजय डगवार, गिरीश कोरडे, गिरीश चंदनखेडे, कुणाल डांगे, अनुप राऊत, शैलेश पांडे, महिला पोलीस पल्लवी बोबडे, ज्योती निनावे व चालक रमाकांत साळवे यांनी केली.(प्रतिनिधी)