बचावाकरिता ठाणेदाराने झाडली हवेत गोळी

By Admin | Updated: July 15, 2015 02:34 IST2015-07-15T02:34:02+5:302015-07-15T02:34:02+5:30

गावठी दारूच्या भट्ट्या नष्ट करण्याकरिता गेलेल्या दहेगावच्या ठाणेदारासह त्याच्या सहकाऱ्यांवर पारधी बेड्यातील नागरिकांनी हल्ला केला. यात ठाणेदार जखमी झाले.

Pole shot in the air | बचावाकरिता ठाणेदाराने झाडली हवेत गोळी

बचावाकरिता ठाणेदाराने झाडली हवेत गोळी

धपकी पारधी बेड्यावरील घटना : दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला
वर्धा : गावठी दारूच्या भट्ट्या नष्ट करण्याकरिता गेलेल्या दहेगावच्या ठाणेदारासह त्याच्या सहकाऱ्यांवर पारधी बेड्यातील नागरिकांनी हल्ला केला. यात ठाणेदार जखमी झाले. या हल्लेखोरांपासून बचावाकरिता अखेर ठाणेदाराला हवेत गोळी झाडावी लागली. ही घटना दहेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या धपकी पारधी बेड्यावर मंगळवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
या हल्ल्यात दहेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनीष बन्सोड हे जखमी झाले. त्यांच्या तक्रारीवरून दहेगाव पोलिसांनी ऋषिलाल पवार, चंदू भोसले, अनिल भोसले, रामचंद्र काहे, शांतीलाल पवार, विनोद राऊत, मिथून मारवाडे यांच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. तर सदर पोलीस अधिकाऱ्याने बेड्यावरील महिलांशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याने हल्ला केल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह विभागाच्या सूचना असल्याने जिल्ह्यात गावठी दारूभट्ट्या नष्ट करण्याच्या सूचना आहेत. यानुसार दहेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या धपकी पारधी बेड्यावर ठाणेदार मनीष बन्सोड चमूसह धाड मारण्याकरिता गेले. यात त्यांच्यासोबत एक महिला कर्मचारीही होती. पारधी बेड्यावर पोहोचताच नजरेत एक भट्टी आढळली. ती भट्टी नष्ट करून ठाणेदार दुसऱ्या भट्टीकडे वळले असता तिथे लपून असलेल्या काही जणांनी त्यांच्यावर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. यात बन्सोड खाली पडले. यावेळी झालेल्या आरडा ओरडीने बेड्यावरील आणखी काही नागरिक धावले. तेही हल्ला करणार याच वेळी ठाणेदार बन्सोड यांनी स्वत:च्या बचावाकरिता त्यांच्याकडील ९ मिमि पिस्टल काढत हवेत एक गोळी झाडल्याची नोंद पोलीस तक्रारीत आहे. यामुळे हल्लेखोर पळून गेले. यात ठाणेदार बन्सोड जखमी झाले. या प्रकरणी दहेगाव ठाण्यात भांदविच्या १४३, १४७, १४८, ३५३, ३८६, २२३ आणि ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
ठाणेदारावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप
धपकी बेड्यावर दारूबंदीची कारवाई करण्याकरिता गेलेल्या ठाणेदाराने बेड्यावरील महिलेशी असभ्य वर्तन केल्याने त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप बेड्यावरील नागरिकांनी केला आहे. या आरोपाचे निवेदन देण्याकरिता बेड्यावरील काही महिला एसपी कार्यालयात निवेदन घेवून आल्या होत्या.

Web Title: Pole shot in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.