Pokland seized with five vehicles | पाच वाहनांसह पोकलॅँण्ड जप्त
पाच वाहनांसह पोकलॅँण्ड जप्त

ठळक मुद्देजिल्हा खनिकर्म विभागाची कारवाई : गौण खनिजाची अवैध वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येळाकेळी येथील खेरडा परिसरातील गिट्टी खदानवर धाड टाकून पाच वाहनांसह पोकलॅण्ड जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
खेरडा येथील सर्व्हे क्रमांक ४९ मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा खनिकर्म विभागाकडून सेलूच्या तहसील कार्यालयाला माहिती देऊन कारवाईचे निर्देश दिले होते. परंतू दोन ते तीन दिवसाचा कालावधी लोटूनही कारवाई झाली नाही. गिट्टी खदानवरील परिस्थिती जैसे थेच असल्याची माहिती मिळाल्याने मंगळवारी दुपारी जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.शेख यांच्यासह कर्मचारी अनंता राऊत व इतर सदस्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता भीषण परिस्थिती निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी सेलूचे तहसीलदार सोनवणे यांनाही फोन करून पाचारण केले. तेही तत्काळ मंडळ अधिकारी व तलाठ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ५ टिप्पर आणि १ पोकलॅण्ड जप्त केला. पुढील कारवाईसाठी हि वाहने सेलू तहसील कार्यालयाच्या स्वाधिन करण्यात आल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी शेख यांनी दिली. पाचही वाहनासह पोकलॅण्ड सेलू तहसील कार्यालयाने जप्त केले आहे. या वाहनांचा पचंनामा करून दंड आकारण्याची सर्व कार्यवाही तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात आली. या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही. त्यामुळे जप्त केलेल्या वाहनाचा क्रमांक व वाहन मालक यांची माहिती मिळू शकली नाही. या कारवाईने गौण खनिज उत्खनन करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. येथील अवैध उत्खननामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांना त्रास होत असून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


Web Title: Pokland seized with five vehicles
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.