खेळा आणि आजारांपासून दूर रहा
By Admin | Updated: February 15, 2017 02:17 IST2017-02-15T02:17:33+5:302017-02-15T02:17:33+5:30
आजचे युग स्पर्धेचे असल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढला आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी जीवनात अभ्यासासह खेळालाही महत्त्व दिले

खेळा आणि आजारांपासून दूर रहा
किशोर पोफळी : पुरस्कार वितरण कार्यक्रम
वर्धा : आजचे युग स्पर्धेचे असल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढला आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी जीवनात अभ्यासासह खेळालाही महत्त्व दिले पाहिजे. मैदानी खेळ खेळल्याने मन व शरीर सुदृढ बनते. शिक्षणासोबतच समाजाला खेळाची उपयोगिता कळली नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासासह विविध खेळांत सहभागी होत सर्वांगीण विकास साधावा व आजारांपासून दूर राहावे, असे आवाहन माजी प्राचार्य किशोर पोफळी यांनी केले.
स्थानिक यशवंत महाविद्यालयात शनिवारी सांस्कृतिक सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या तसेच विविध खेळांत तथा सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होऊन यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनीही यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे. यशप्राप्त विद्यार्थ्यांनी तेथेच न थांबता वरचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करावे. जे यशस्वी होतात त्यांच्यावर जबाबदाऱ्या येतात. त्या समर्थपणे पेलल्या पाहिजे, असे सांगितले.
विद्यार्थ्यांना रोख व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक करीत परिचय डॉ. न.ह. खोडे यांनी करून दिला. संचालन प्रा. एकनाथ मुरकूटे, प्रा. अरुणा हरले, व डॉ. संजय धोटे यांनी केले तर आभार प्रा. भालेकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. राजेश भटकर, प्रा. सूरज पोपटकर, प्रा. उमा खानाडे, प्रा. स्वप्नील उभाड आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)