आश्रम परिसरात प्लास्टिक पसारा
By Admin | Updated: September 21, 2014 23:56 IST2014-09-21T23:56:27+5:302014-09-21T23:56:27+5:30
नजीकच्या पवनार आश्रम परिसरात धाम नदीला सध्या उधाण आले आहे. पर्यटकांची येथे गर्दी पहावयास मिळते. परंतु सध्या परिसरात प्लास्टिक पाऊच आणि सोबतच टिस्पोजेबल ग्लासेसचा खच पहावयास मिळतो.

आश्रम परिसरात प्लास्टिक पसारा
वर्धा : नजीकच्या पवनार आश्रम परिसरात धाम नदीला सध्या उधाण आले आहे. पर्यटकांची येथे गर्दी पहावयास मिळते. परंतु सध्या परिसरात प्लास्टिक पाऊच आणि सोबतच टिस्पोजेबल ग्लासेसचा खच पहावयास मिळतो. पर्यटन स्थळ असतानाही येथे सर्वत्र प्लास्टिक कचरा आढळून येत असल्याने संताप व्यक्त होत असला तरी येणारे पर्यटकच हा कचरा निर्माण करीत असल्याचे जळजळीत वास्तव नाकारता येत नाही.
जवळपासचे पर्यटक पवनारला एक दिवसाचा विरंगुळा म्हणून पसंती देतात. खडकाळ पात्रातून वाहत असलेल्ल्या वैशिष्ट्यपूर्ण धाम नदीच्या पात्रामुळे आणि पायथ्याशी असलेल्या विनोबा आश्रमामुळे परिसराताला ऐतिहासिक वारसा आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. सायंकाळी दररोज शेकडो नागरिक नदीपरिसरात फिरण्यासाठी येतात. पवनारचा कच्चा चिवडा प्रसिद्ध आहे. त्यामुळे आलेला पर्यटक त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय परत जात नाही. या कारणाने स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. परंतु परिसरात पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही. असलेले हातपंत खारवट पाण्याचे आहे. त्यामुळे प्लास्टिक पाणी पाऊच विक्रीचे प्रमाण वाढले आहे. खाद्यपदार्थ खाल्ल्यावर पाणी पाऊच घेऊन पाणी पिल्याशिवाय गत्यंतर रहात नाही.
पाणी पिल्यावर ते पाणी पाऊच अस्थाव्यस्थ कुठेही फेकून देण्याची सवय बहुतेकांना असते. हाच प्रकार येथेही पहावयास मिळतो. आश्रम परिसरातील छत्री परिसर आणि समाधीकडे जात असलेल्या मार्गावर प्लास्टिकचा खच साचलेला पहावयास मिळतो. या कारणाने येथे घाणीचे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पहावयास मिळते. कुठेही कचराकुंडी नसल्याने तसेच प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरात जगोजागी उकिरडा तयार झाला आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.(शहर प्रतिनिधी)