पंचायत समितीतच सडले अनुदानातील पाईप
By Admin | Updated: May 22, 2015 02:22 IST2015-05-22T02:22:01+5:302015-05-22T02:22:01+5:30
पंचायत समितीमार्फत शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्याचे अनुदानावर वाटप केले जाते.

पंचायत समितीतच सडले अनुदानातील पाईप
रूपेश मस्के कारंजा (घा.)
पंचायत समितीमार्फत शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्याचे अनुदानावर वाटप केले जाते. स्थानिक पं.स. कार्यालयासही ते साहित्य प्राप्त झाले; पण त्याचे वाटपच झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांसाठी आलेले पाईप व अन्य साहित्य पं.स. च्या आवारातच सडले. हा प्रकार येथील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतोय.
विविध योजनांतर्गत शेतीपयोगी साहित्य अनुदानावर थेट शेतकऱ्यांना मिळावे म्हणून राज्यशासन वा जि.प. अंतर्गत ते पाठविले जाते; पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते वा नाही, हा प्रश्नच आहे. पं.स. वा जि.प. सदस्य यांच्याही फंडातून वाटपासाठी वा थेट पं.स. अंतर्गत कृषी अवजारे, कृषी साहित्य, इलेक्ट्रीक मोटर पंप, शिलाई मशीन, पिव्हीसी पाईप, ठिंबक पाईप, रबरी पाईप, ताडपत्री आदी अनेक प्रकारचे साहित्य येते. सध्या पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यामुळे जुनी इमारत पाडल्याने त्यातील कुजलेले साहित्य, सडलेले पाईप रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेत. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाकरित वा ओलित करता यावे म्हणून हे पाईप अनुदान स्वरुपात वाटण्यासाठी आले होते; पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. या पाईपप्रमाणेच अन्य साहित्यही जागेवरच सडले असावे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. यंदा अनुदानावर ताडपत्री उपलब्ध झाली होती. त्याही धूळखात होत्या; पण पं.स. व जि.प. सदस्यांनी याची दखल घेतल्याने मागेल त्याला ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.
शासनाकडून सबसिडीवर वितरित होणाऱ्या साहित्याच्या लाभार्थी यादीत तीच ती नावे दिसतात. अन्य शेतकऱ्यांना याबाबत विचारणा होत नाही व माहितीही दिली जात नसल्यानेही बरेचदा साहित्य जागेवर सडत असल्याचे सांगितले जाते. संबधित विभाग दखल घेत नसल्याने शेतीसाहित्याची धुळधान होत असून ते फेकावे लागत आहे. याकडे लक्ष देत कारवाई होणे गरजेचे झाले आहे.