‘एक व्यक्ती एक वृक्ष’ संगोपनाचा संदेश देणारा चित्ररथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:33 IST2018-06-06T00:32:53+5:302018-06-06T00:33:01+5:30
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वर्धा वन विभागाच्यावतीने आकर्षक व इतरांना वृक्षसंगोपनाचा संदेश देणारा चित्ररथ तयार केला आहे. हा चित्ररथ पुढील ५६ दिवस जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्रत्येक गावात जावून ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ संगोपनाचा संदेश देणार आहे.

‘एक व्यक्ती एक वृक्ष’ संगोपनाचा संदेश देणारा चित्ररथ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वर्धा वन विभागाच्यावतीने आकर्षक व इतरांना वृक्षसंगोपनाचा संदेश देणारा चित्ररथ तयार केला आहे. हा चित्ररथ पुढील ५६ दिवस जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्रत्येक गावात जावून ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ संगोपनाचा संदेश देणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात खा. रामदास तडस यांनी या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविली.
वृक्षाचे महत्त्व ओळखून गत काही वर्षांपासून ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वात पावसाळ्याच्या सुरूवातीला शासकीय यंत्रणा वृक्षलागवडीचा उपक्रम राबवित आहे. या वृक्ष लागवडीच्या उपक्रमातून सुंदर महाराष्ट्र-हिरवे महाराष्ट्र हा उद्देश साध्य केल्या जाणार आहे. यंदाच्या वर्षी १३ कोटी वृक्ष लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होणार आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या वृक्ष लागवड उपक्रमात विविध सामाजिक संघटना तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून या चित्ररथाच्या माध्यमातून गावपातळीवर प्रभावी जनजागृती करण्यात येणार आहे.
या चित्ररथाच्या माध्यमातून ‘चला घडवूया हरित महाराष्ट्र’ असे आवाहन करीत वृक्षाचे महत्त्व पटवून दिल्या जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, सामाजिक वनीकरणचे विभागीय अधिकारी आर. बी. गवई, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व वन्यजीव) सुहास बढेकर, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे. व कॅम्पा) निकीता चोरे, वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी एस.एस. बन्सोड, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.