पाणीपुरवठा योजनेची कामे कायमस्वरुपी करा

By Admin | Updated: December 16, 2015 02:15 IST2015-12-16T02:15:19+5:302015-12-16T02:15:19+5:30

तालुक्यातील गावांत येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही, याबाबत दक्षता घेत पाणी पुरवठ्याची कामे कायमस्वरूपी करा, ....

Permanently renovate the water supply scheme | पाणीपुरवठा योजनेची कामे कायमस्वरुपी करा

पाणीपुरवठा योजनेची कामे कायमस्वरुपी करा

रणजित कांबळे : पं. स. सभागृहात संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक
देवळी : तालुक्यातील गावांत येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही, याबाबत दक्षता घेत पाणी पुरवठ्याची कामे कायमस्वरूपी करा, अशी सूचना देवळी विधानसभा क्षेत्राचे आमदार रणजित कांबळे यांनी ग्रामपंचयतीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
देवळी पंचायत समिती सभागृहात संभाव्य पाणीटंचाई कृती आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीत ग्रामसेवकांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळली. यावेळी तहसीलदार तेजस्विनी जाधव, सभापती भगवान भरणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, उपसभापती गुलाब डफरे, जिल्हा परिषद सदस्य संजय कामनापुरे, जिल्हा परिषद सदस्य उज्वला राऊत, मोरेश्वर खोडके, माजी सभापती दिनेश बाहे आदींची उपस्थिती होती.
तालुक्यात डिसेंबर ते जून २०१६ पर्यंत पाणीटंचाई भासू नये, याकरिता प्रस्ताव, पाणीपुरवठ्यातील अडचणी व समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणी पुरवठ्याची कामे, गाव हागणदारीमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र न मिळाल्याने काही गावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामाचे देयक न मिळाल्याचे यावेळी ग्रामसेवकांनी सांगितले.
योजना पूर्ण करण्याचा कालावधी अठरा महिन्यांचा असतानासुद्धा बरीच कामे अर्धवट असल्याचे यावेळी उघड झाले. यावेळी आ. कांबळे यांनी कामाच्या कालावधीची विचारणा केली असता ग्रामसेवकांना उत्तर देता आले नाही. प्रत्येक गावांचा आढावा घेताना ग्रामसेवकांच्या माहितीमध्ये विसंगती दिसून आली. सरुळ येथील काम अर्धवट असून कंत्राटदाराने अद्यापही मोटारपंप लावला नाही. तसेच तालुक्यातील बहुतांश गावामध्ये पाणीटंचाई नसल्याचे समोर आले. नदी काठच्या गावांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे कायमस्वरुपी करावी, असे आ. कांबळे यांनी यावेळी सांगितले. पाणीपुरवठ्याची माहिती, मुल्यांकन आणि देयके देण्यात विलंब करणाऱ्या अभियंत्याची आमदार कांबळे यांनी कानउघाडणी केली. तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाई भासू नये, याकरिता नवीन पाईप लाईन टाकण्याची मागणी करण्यात आली.
यात गिरोली, दहेगाव(धांदे), पिपरी, नागझरी, सावंगी (येंडे), नांदगाव आदी गावांचा समावेश आहे. मलकापूर येथे उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले. रोहणी येथे पाईपलाईन टाकणे, विहिरीचे खोलीकरण, तळणी (भागवत) येथील पाईपलाईनची दुरुस्ती, बोरगाव(आलोडा) येथील नळ योजनेचे काम पूर्ण झाले आहे. परंतु वीजपुरवठ्याअभावी पाणीपुरवठा बंद आहे. आदी समस्या बैठकीत मांडल्या.
प्रास्ताविक गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी केले. यावेळी कृषी अधिकारी ब्राह्मणे, जिल्हा परिषद सदस्य मोहन शिदोडकर, श्रीधर लाभे, मंगला इटाळे, वर्षा घोडस्वार, रोशना वाढवे, पाणीपुरवठा अभियंता प्रशांत मेश्राम, राजेश गावंडे व कर्मचारी उपस्थित होती.(प्रतिनिधी)

Web Title: Permanently renovate the water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.