आॅनलाईन अर्जदारांचे निकाल प्रलंबित
By Admin | Updated: May 24, 2016 02:07 IST2016-05-24T02:07:47+5:302016-05-24T02:07:47+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरची एम.ए. भाग एकची हिवाळी परीक्षा २४ आॅक्टोबर २०१५ मध्ये पार पडली. यात येथील ३८ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले.

आॅनलाईन अर्जदारांचे निकाल प्रलंबित
३८ विद्यार्थ्यांचा समावेश : शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती
हिंगणघाट : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरची एम.ए. भाग एकची हिवाळी परीक्षा २४ आॅक्टोबर २०१५ मध्ये पार पडली. यात येथील ३८ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. परीक्षेच्या वेळी या विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांक मिळण्यात अडचणी आल्या. कसेबसे क्रमांक मिळाले आणि परीक्षा झाली; पण अद्याप निकाल जाहीर करण्यात आला नाही. या बाबत विद्यार्थ्यांना कुठूनही योग्य उत्तर मिळत नाही. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
स्थानिक रा.सु. बिडकर महाविद्यालयातून एम.ए. भाग-१ च्या ५० विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने अर्ज भरून घेतले; पण त्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र देण्यात आले नाही. विद्यार्थी परीक्षेसाठी गेले असता त्यांना महाविद्यालयातर्फे परीक्षा क्रमांक ‘अरेंज’ करून देण्यात आले. परीक्षा सुरळीत पार पडली. निकाल मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. परीक्षेला बसण्यापूर्वी परवानगी का घेतली नाही, असा हेका विद्यापीठातर्फे धरला जात आहे. शिवाय विद्यापीठाला सूचना न देता विद्यार्थी परीक्षेला बसलेच कसे, अशीही विचारणा केली जात आहे. याच कारणामुळे सदर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. याबाबत महाविद्यालयात विचारणा केली असता तेथूनही व्यवस्थित उत्तर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
एमए भाग एकच्या हिवाळी परीक्षेकरिता प्रत्येक विद्यार्थ्याने एक हजार रुपये खर्च केले आहेत. परीक्षा शुल्कापोटी ५० विद्यार्थ्यांनी ५० हजार रुपये अदा केले असताना निकाल जाहीर केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विद्यापीठ प्रशासन व महाविद्यालयाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)
महाविद्यालय म्हणते, वर्ष वाया जाणार नाही
शहरातील ३८ विद्यार्थ्यांनी एम.ए.भाग एकच्या फर्स्ट सेमिस्टरसाठी आॅनलाईन अर्ज केले होते. विद्यापीठाने त्यांना परीक्षा ओळखपत्र दिले नाही. यामुळे महाविद्यालयाने मध्यस्थी करून विद्यार्थ्यांना रोल नंबर अरेंज करून दिले. त्यांना परीक्षा देता आली असून निकालही जाहीर होणार आहे. यासाठीची प्रक्रिया राबविली जात आहे. याबाबत तीन बैठका झाल्या असून डॉ. पाहुणे यांची प्रकृती बिघडल्याने काही काळ ही प्रक्रिया रखडली. असे असले तरी विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, अशी माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. त्यांना परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयाने मदत केली. शिवाय विद्यापीठाशी संपर्क करून त्यांच्या उत्तरपत्रिकांचे क्रमांक वेगळे करून ते तपासणीसाठी पाठविले. उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या असून विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल जाहीर करण्याबाबत तीन बैठका घेण्यात आल्यात. याबाबतचा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूनेच लागणार असून त्याचे वर्ष वाया जाणार नाही. यासाठी महाविद्यालयाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत.
- डॉ. भास्कर आंबटकर, प्राचार्य, रा.सु. बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट.