‘त्या’ बिल्डरवर दंडात्मक कारवाई

By Admin | Updated: November 11, 2015 01:33 IST2015-11-11T01:33:55+5:302015-11-11T01:33:55+5:30

खैरी शिवारात नागपूरच्या बिल्डरने शेती विकत घेतली. तेथील विहिरीवर मोटारपंप लावून वीज तारावर हूक टाकून गत सहा महिने ओलित केले.

Penalties for 'those' builders | ‘त्या’ बिल्डरवर दंडात्मक कारवाई

‘त्या’ बिल्डरवर दंडात्मक कारवाई

वीज चोरी प्रकरण : वायर, पेटीही जप्त, कारवाईला संशयाचे वलय
सेलू : खैरी शिवारात नागपूरच्या बिल्डरने शेती विकत घेतली. तेथील विहिरीवर मोटारपंप लावून वीज तारावर हूक टाकून गत सहा महिने ओलित केले. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी वृत्त प्रकाशित केली. वृत्त उमटताच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत तेथील साहित्य ताब्यात घेतले. शिवाय ११ हजार ५६० रुपयांचा दंड बिल्डरकडून वसूल केला. असे असले तरी दहशत व अर्थपूर्ण संबंधामुळे ही कारवाई शंका निर्माण करणारी आहे. यामुळे शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे.
नागपूरच्या पाठक नामक बिल्डरने खैरी शिवारात दहा एकर शेती विकत घेतली. तेथील विहिरीची दुरूस्ती करून मोटारपंप लावला. शेतात बंगला बांधला. कोणतेही पीक न घेता छंदासाठी फळांची व शोभेची झाडे लावली. अधिकृत वीज जोडणी न घेताच वीज वितरण कंपनीच्या तारावर हुक टाकून सहा महिन्यांपासून विजेची चोरी करीत झाडांना पाणी दिले. या चोरीची सचित्र माहिती एका शेतकऱ्याने ‘व्हाट्स अ‍ॅप’वर सेलूचे उपकार्यकारी अभियंता संजय पुरी यांच्या मोबाईलवर पाठविली. १०-१५ दिवसांचा कालावधी लोटूनही कारवाई करण्यात आली नाही. अखेर सदर शेतकऱ्याने ही बाब लोकमतच्या निदर्शनास आणून दिली.
उपकार्यकारी अभियंता संजय पुरी यांना संबंधित वृत्तासाठी प्रतिक्रीया घेण्यास्तव भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता अधिनस्थ अधिकाऱ्यांना पाठवून कारवाई करतो, असे सांगितले. यानंतर त्वरित रेहकीचे कनिष्ठ अभियंता ए.आर. गजभिये यांना घटनास्थळी पाठविले; पण अभियंता, लाईनमन मोहरकर, कुंदारे थेट घटनास्थळाकडे निघाले. जाताना त्यांनी झडशी येथे वेळ घालविला. सदर बिल्डरला सूचना देऊन हुकांसह वायर खाली ओढून घेण्यास भ्रमणध्वनीवर सूचना केली. यानंतर वरातीमागून घोडे हाकत ही चमू घटनास्थळी पोहोचली. हुका तारावर नव्हत्या, असा देखावा निर्माण करीत हुकांसह वायर, खांबावरील पेटी जप्त केली; पण विहिरीतील मोटारपंप जप्त केला नाही.
लोकमतमध्ये वृत्त झळकताच उपकार्यकारी अभियंता संजय पुरी यांनी कनिष्ठ अभियंता गजभियेसह घटनास्थळी जावून पंचनामा केला. ही कारवाई प्रचंड राजकीय दबावाखाली करण्यात आली. सहा महिने अवैध वीज पुरवठा वापरूनही केवळ ८ हजार ५६० रुपये बिलापोटी व तीन हजार रुपये कंपाऊंड चार्जेस, असे ११ हजार ५६० रुपयांचे नाममात्र बिल माणिक मनोहर पाठक यांच्या नावे दिले. शेतकऱ्याने हा प्रकार केला असता तर इभ्रतीचे धिंडवडे काढत पोलीस कारवाईची भीती दाखवून मनमानी दंड वसूल केला असता. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)

अधिकृत वीज असताना शेतकऱ्याला दंड
शेतकऱ्याकडे अधिकृत वीज पुरवठा असताना मंजूर क्षमतेपेक्षा अधिक (एच.पी.) अश्वशक्तीची मोटार लावून वापर केल्याप्रकरणी भरमसाठ दंड वसूल केल्याच्या घटना ताज्या आहे. राजकीय वजनातून एका बिल्डरवर थातूरमातूर दंडाची कारवाई सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांच्या मनात वीज वितरण कंपनीविरूद्ध संताप निर्माण करणारी आहे. वीज चोरीची सचित्र माहिती एका शेतकऱ्याने अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर १०-१५ दिवसानंतरही काहीच कारवाई न होणे, हेच राजकीय दबाव असल्याचे जिवंत उदाहरण असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे.

लोकमतने भ्रमणध्वनीवर माहिती देताच मी माझ्या अधिनस्थ कनिष्ठ अभियंत्याला कर्मचाऱ्यासह घटनास्थळी सोमवारी रात्रीच पाठविले व कारवाई केली. त्यांच्या सांगण्यानुसार तारावरून हुका काढलेल्या होत्या; पण वीज चोरी होत असल्याबाबत पुरावा असल्याने वायर व पेटीसह साहित्य जप्त केले व दंडात्मक कारवाई केली.
- संजय पुरी, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, सेलू.

या चोरी प्रकरणी उपकार्यकारी अभियंत्यानी सांगताच मी सोमवारी घटनास्थळी जावून कार्यवाही केली. वायर, पेटी व साहित्य जप्त केले. पाण्यातील मोटार जप्त केली नाही. मंगळवारी उपकार्यकारी अभियंता पुरी यांच्यासह घटनास्थळी जावून पंचनामा करण्यात आला.
- ए.आर. गजभिये, कनिष्ठ अभियंता, वीज वितरण कंपनी, रेहकी.

Web Title: Penalties for 'those' builders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.