मराठी संतांच्या जीवनदृष्टीला समाजनिष्ठेचा कणा

By Admin | Updated: August 3, 2014 00:15 IST2014-08-03T00:15:12+5:302014-08-03T00:15:12+5:30

संतांनी केलेले समाजप्रबोधन महत्त्वाचे ठरले़ मराठी संतमंडळींनी भक्तीमार्गातून नवसमाजनिर्मिती व विवेकनिष्ठ चारित्र्यसंपन्न माणूस घडविण्याचे कार्य केले आहे़ सर्व मराठी संतांच्या

The peculiarity of Marathi saints | मराठी संतांच्या जीवनदृष्टीला समाजनिष्ठेचा कणा

मराठी संतांच्या जीवनदृष्टीला समाजनिष्ठेचा कणा

‘संतवाणीतील लोकप्रबोधन’वर परिसंवाद : तुग़़ माने यांचे प्रतिपादन; संयुक्त उपक्रम
वर्धा : संतांनी केलेले समाजप्रबोधन महत्त्वाचे ठरले़ मराठी संतमंडळींनी भक्तीमार्गातून नवसमाजनिर्मिती व विवेकनिष्ठ चारित्र्यसंपन्न माणूस घडविण्याचे कार्य केले आहे़ सर्व मराठी संतांच्या जीवनदृष्टीला समाजनिष्ठेचा कणा आहे, असे प्रतिपादन प्रा. तु.ग. माने यांनी केले़
सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय व नामसंकीर्तन सत्संग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालयाच्या सभागृहात संतवाणीतील लोकप्रबोधन विषयावर परिसंवाद घेण्यात आला़ यावेळी अध्यक्षीय भाषण ते करीत होते़ उद्घाटन वाचनालयाचे सचिव गौरीशंकर टिबडेवाल यांनी केले. यात पहिले व्याख्यान प्रा. सरोज देशमुख यांचे ‘संत गाडगे महाराजांचे विचार प्रबोधन’ विषयावर झाले. संत गाडगेबाबा निरक्षर असताना त्यांनी महाराष्ट्रात अखंड भ्रमण करून कीर्तनाद्वारे समाजात विचार प्रबोधन घडवून आणले. गरीब व दु:खितांची सेवा हा त्यांचा ध्यास होता. त्यांची वेषभूषा म्हणजे डोक्यावर खापर, अंगावर रंगीबेरंगी चिंध्या, हातात खराटा अशी अत्यंत साधी असे. कीर्तन करताना हातात दोन दगडाचे टाळ व श्रोत्यांच्या टाळ्या, घोष, असा थाट असे. कीर्तनातून त्यांनी समाजातील कुप्रथा व अंधश्रद्धा यावर कठोर प्रहार केले. मुले शिकवा, आई-वडिलांची सेवा करा, शिवाशीव पाळू नका, भुकेल्यांना अन्न द्या, दारू पिऊ नका, हुंडा घेऊ नका, देवाला नवस करून प्राणिमात्रांची हत्या करू नका आदी त्यांचे कीर्तनातील विषय असत. अनेक लोकोपयोगी कामांसाठी त्यांनी समाजास प्रवृत्त केले. त्यात धर्मशाळा घाट, अन्नछत्रे, पाणपोया, पूल आदींचा समावेश आहे. त्यांनी माणसांत देव पाहिला़ दीनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा, अशी त्यांची धारणा होती.
दुसरे व्याख्यान बाळकृृष्ण हांडे यांचे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाजप्रबोधन’ विषयावर झाले. राष्ट्रसंतांच्या विचारातून मानवत्व ते महामानवापर्यंतची त्यांची गतिमान वाटचाल आढळून येते. विविध धर्म व त्यांचे साहित्य यांचा तौलनिक विचार त्यांनी केला़ सर्वधर्म समभाव, सर्वधर्म प्रार्थना, सामूदायिक प्रार्थना या बाबी त्यातूनच निर्माण झाल्या़ ग्रामगीता ही राष्ट्रसंतांची वाङमयीन मूर्ती आहे. त्यांचे जिज्ञासा विषय अगणित स्वरुपात दिसून येतात. त्यात समाजकार्य, राष्ट्रकार्य, अर्थकारण, स्त्री शुद्रांच्या प्रखर समस्या, जातीभेद, स्त्री-मुलांचे शिक्षण, समाजाचे विदारक चित्रण, पारतंत्र्याविरूद्धची तीव्र प्रतिक्रीया आदी बाबींचा समावेश झालेला दिसेल. त्यांनी विपूल ग्रंथरचना केली आहे. त्यांच्या विचारांचे अंतिम उद्दिष्ट विश्वशांती व विश्वकल्यान आहे. त्यांनी गुरूकुंज आश्रम व गुरूदेव सेवा मंडळाद्वारे असंख्य प्रचारक, कार्यकर्ते निर्माण करून हे कार्य पूढे चालविले आहे.
शेवटचे व्याख्यान डॉ. दादासाहेब आमसवार यांचे ‘वारकरी संतांचे सर्व समावेशक प्रबोधन’ विषयावर झाले. आज ७०० वर्षे उलटून गेल्यावरही वारकरी संतांनी दिलेली शिकवण, केलेली समाज प्रबोधन महत्त्वाचे ठरते़ त्यांनी संस्कृत धर्मग्रंथातील आशय सामान्यांसाठी मराठी भाषेतून मोकळा केला. भागवत धर्ममंदिराचा पाया रचणाऱ्या संत ज्ञानेश्वरांनी विस्कळीत वारकरी संप्रदायाला तत्वज्ञान, आचार व विचारधर्म यांचा कणा दिला. ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत’ या न्यायाने प्राणियांची सेवा हीच सर्वात्मक इश्वराची पूजा होय, ही जाणीव दिली़ ईश्वराची पूजा ही स्वकर्म सुमनांनी केल्यास ईश्वर संतोष पावतो. ही कर्मे आचरताना प्रपंच सोडण्याची गरज नाही. वारकरी संतांनी कर्मकांडांचा निषेध केला आहे.
दुसऱ्या दिवशी हभप सुधा देशमुख व कीर्तनाचार्य राम काळे यांचे कीर्तन झाले़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The peculiarity of Marathi saints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.