जिल्हा रुग्णालयात ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याला फाटा? सोनोग्राफी विभागातील प्रकार 

By महेश सायखेडे | Published: July 18, 2023 06:26 PM2023-07-18T18:26:29+5:302023-07-18T18:28:07+5:30

महिला रेडिओलॉजिस्टच्या मनमर्जीमुळे रुग्णांना मनस्ताप

'PCPNDT' law has breaks in the district hospital? Types of sonography section | जिल्हा रुग्णालयात ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याला फाटा? सोनोग्राफी विभागातील प्रकार 

जिल्हा रुग्णालयात ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याला फाटा? सोनोग्राफी विभागातील प्रकार 

googlenewsNext

वर्धा : शासकीय असो वा खासगी प्रत्येक सोनोग्राफी सेंटरमध्ये पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. जो कुणी व्यक्ती किंवा संस्था यात हयगय करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांना दिल्या आहेत; पण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी विभागातच पीसीपीएनडीटी कायद्याला बगल दिली जात आहे. इतकेच नव्हे तर कंत्राटी महिला रेडिओलॉजिस्ट डॉ. रूपाली भालेराव यांच्या मनमर्जीमुळे सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिला- पुरुष रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये आढळून आले.

‘लोकमत’ने काय बघितले?

* पोटाखालील भागात खूप जास्त वेतना होत असल्याने सुमारे २२ वर्षीय महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आली.
* संबंधित महिलेने ओपीडी चिठ्ठी काढून डॉक्टरांकडून तपासणी करून तिला औषधोपचार दिले.
* महिलेचे दुखणे कायम राहिल्याने कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी संबंधित महिलेला किडनी स्टोन तर नाही ना याची शहानिशा करण्यासाठी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला.
* शिवाय कर्तव्यावरील डॉक्टरांनी सोनोग्राफीचा फाॅर्म भरून देत त्यावर ‘अर्जंट’ अशी विनंती नमूद केली.
* असह्य वेदना असतानाही या महिलेने तिच्या पतीसोबत जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी विभाग गाठला; पण त्यांना आज सोनोग्राफी होणार नाही, असे सांगत थेट २० जुलै रोजीची अपॉइंटमेंट देण्यात आली.
* सोनोग्राफी विभागात रेडिओलॉजिस्ट डॉ. रूपाली भालेराव असतानाही आणि डॉक्टरांनी सोनोग्राफी फॉर्मवर अर्जंट असे नमूद केल्यावर सोनोग्राफीला नकार दिला जात असल्याने संबंधित महिलेच्या पतीने थेट अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल वानखेडे यांच्याकडे तक्रार केली.
* रुग्णाची आणि रुग्णाच्या नातेवाइकाची समस्या लक्षात घेता अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनीही तातडीने सोनोग्राफी विभागात फोन लावून कर्तव्यावर असलेल्या रेडिओलॉजिस्टची कानउघाडणी केली.
* अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांकडून कानउघाडणी होताच संबंधित महिलेची सोनोग्राफी करून तिला सोनोग्राफीचा अहवाल देण्यात आला.

डॉक्टरांच्या विनंतीला नेहमीच दिला जातो फाटा

जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर महिलांचा सर्वाधिक विश्वास आहे. तेथे प्रसूतीसाठी मोठ्या संख्येने महिला दाखल होतात. गरोदर आणि स्तनदा महिलांना तसेच इतर महिला व पुरुषांना अर्जंट सोनोग्राफी जिल्हा रुग्णालयातीलच डॉक्टरांनी लिहून दिल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी विभागातील रेडिओलॉजिस्ट डॉ. रूपाली भालेराव आणि कार्यरत परिचारिका नेहमीच रुग्णांना सोनोग्राफीसाठी पुढील तारीख देऊन जणू डॉक्टरांच्या विनंतीला फाटाच देत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

यापूर्वी वाटल्या खासगी रुग्णालयाच्या चिठ्ठ्या

जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात आयपीएचएसअंतर्गत सेवा देणाऱ्या डॉ. रूपाली भालेराव या कंत्राटी रेडिओलॉजिस्ट आहेत. शिवाय त्यांचे वर्धा शहरातच आर्वी मार्गावर खासगी सोनोग्राफी सेंटर आहे. डॉ. रूपाली भालेराव या त्यांच्या मनमर्जी कारभारामुळे सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, डॉ. रूपाली भालेराव यांनी यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात सोनोग्राफीसाठी आलेल्या रुग्णांना आपल्या खासगी सोनोग्राफी सेंटरच्या चिठ्ठ्या दिल्या होत्या. त्यामुळे त्यांना वरिष्ठांनी तंबीही दिली होती, असे सांगण्यात आले.

पत्नीच्या पोटात अतिशय जास्त दुखत असल्याने आपण तिला घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात आलो. डॉक्टरांनी उपचार केल्यावर अर्जंट सोनोग्राफी लिहून दिली. त्यामुळे आपण पत्नीला घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या सोनोग्राफी विभागात गेलाे; पण डॉ. रूपाली भालेराव कर्तव्यावर असतानाही सोनोग्राफी करून देण्यास नकार देण्यात आला. शिवाय २० जुलै ही सोनोग्राफीसाठी तारीख देण्यात आली. त्यामुळे आपण थेट अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेत त्यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी सोनोग्राफी विभागात फोन केल्यावर सोनोग्राफी करून देण्यात आली.

- मयूर सलामे, वर्धा.

जिल्हा रुग्णालयाच्या सोनोग्राफी विभागातील रेडिओलॉजिस्ट डॉ. रुपाली भालेराव या कंत्राटी आहेत. कायमस्वरूपी रेडिओलॉजिस्ट नसल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सलामे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण सोनोग्राफी विभागात सूचना केल्या. शासनाकडून कायमस्वरूपी रेडिओलॉजिस्ट उपलब्ध झाल्यावर डॉ. भालेराव यांची सेवा समाप्त करण्यात येईल.

- डॉ. अनिल वानखेडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

Web Title: 'PCPNDT' law has breaks in the district hospital? Types of sonography section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.