वीज दरवाढीविरोधात देयकांचे तोरण
By Admin | Updated: July 13, 2016 02:49 IST2016-07-13T02:49:40+5:302016-07-13T02:49:40+5:30
विदर्भातील नागपूर व अमरावती येथे महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीच्या विरोधात सोमवारी प्रहारच्यावतीने...

वीज दरवाढीविरोधात देयकांचे तोरण
प्रहारचे आंदोलन : दरवाढ रोखण्याची मागणी
हिंगणघाट : विदर्भातील नागपूर व अमरावती येथे महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीच्या विरोधात सोमवारी प्रहारच्यावतीने विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला विद्युत बिलाचे तोरण बांधण्याचे अभिनव आंदोलन करण्यात आले. वीज दरवाढीच्याविरोधात अधिकऱ्यांना निवेदन देवून प्रस्तावित दरवाढ केल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
प्रहारचे जिल्हाध्यक्ष गजु कुबडे यांच्या नेतृत्त्वात लक्ष्मी टॉकीज चौकातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. संभाव्य दरवाढीचा निषेध करणाऱ्या घोषणा कार्यकर्ते देत होते. एकीकडे उर्जामंत्री बावनकुळे यांनी विदर्भात विजेचे दर कमी करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये १ हजार कोटीची तरतुद केल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे नागपूर व अमरावती येथे महावितरणाच्या प्रस्तावित भरमसाठ वीज दरवाढीसाठी जनसुनावणी घेण्यात येत आहे. प्रस्तावित वीजदरवाढीला मंजुरी मिळाल्यास शेजारी राज्याच्या तुलनेत विजेचे दर दीड ते दोन पटीने वाढणार आहे. याचा गंभीर परिणाम उद्योग व्यवसायावर होवून बेरोजगारीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
याकडे लक्ष वेधण्याकडे प्रहारचे पक्षप्रमुख आ. बच्चू कडू यांनी या विरोधात विदर्भात आंदोलनाचा इशारा दिला आहे. यानुसार येथे गजानन कुबडे, तालुका प्रमुख राजु बोभाटे, समुद्रपूर तालुका प्रमुख देवा धोटे, सेलू तालुका प्रमुख मिलिंद गोमासे, वर्धा शहर प्रमुख विकास दांडगे, हिंगणघाट शहर प्रमुख दिवाकर वाघमारे, प्रदीप मून, अजय लढी, खोमलाल जगराह, प्रवीण बोरुटकर, अजय खेडेकर, गणेश बलखंडे, सचिन धंगारे, किशोर हेडाऊ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)