रिडींग न घेताच दिले जाते ग्राहकांना देयक
By Admin | Updated: July 29, 2015 02:04 IST2015-07-29T02:04:16+5:302015-07-29T02:04:16+5:30
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका ग्राहकांना वारंवार सोसावा लागतो. मात्र यात कोणतीच सुधारणा केली जात नसल्याच्या

रिडींग न घेताच दिले जाते ग्राहकांना देयक
तळेगाव (श्या.पं.) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका ग्राहकांना वारंवार सोसावा लागतो. मात्र यात कोणतीच सुधारणा केली जात नसल्याच्या प्रत्यय तळेगाव येथील शेतकऱ्यांना वारंवार येत आहे. वीज देयक देताना मिटरचे रिडींग न घेता अतिरिक्त देयक ग्राहकांच्या माथी मारण्यात आले आहे. याबाबत ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार केली आहे.
परिसरातील मौजा देवगाव, जुनोना येथील काही शेतकऱ्यांचे मोटारपंप गत चार महिन्यांपासून विद्युत प्रवाह नसल्याने बंद अवस्थेत आहे. तरीही त्यांना विद्युत वितरण विभागाने देयक दिले आहे. तसेच येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात मिटर असूनसुध्दा विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी शेताकडे न जाता परस्पर देयक देऊन मोकळे होतात. त्यामुळे कधी अधिक तर कधी कमी देयक दिले जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मीटर रिडींग न घेता सर्रास सरासरी काढून देयक दिले जात असल्याचा प्रत्यय यापूर्वी अनेकांना आला आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.
एकीकडे निसर्गाचा कोप सुरू असल्याने पिकांची अवस्था दयनीय आहे. अशात पिकांना ओलीत करण्याची गरज आहे, मात्र विद्युत पुरवठा केला जात नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना शासनातर्फे रोजगार हमी योजनेतून नवीन विहिरी देण्यात आल्या. यानंतर शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीकडे जोडणीसाठी डिमांड भरला. परंतु अजुनपर्यंत त्यांच्या शेतात विद्युत जोडणी देण्यात आली नाही. यामुळे निसर्गाचा कोप आणि विद्युत वितरणची वक्रदृष्टी या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. या समस्येची संबंधित विभागाने दखल घेण्याची मागणी भाजपा किसान आघाडीचे उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी तक्रारीतून केली आहे. याबाबत कार्यवाहीकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)