वाढीव कामांची देयके त्वरित द्या
By Admin | Updated: March 16, 2015 01:40 IST2015-03-16T01:40:10+5:302015-03-16T01:40:10+5:30
जि़प़ बांधकाम विभागाने २०१४-१५ मध्ये एफडीआर कामे करून घेतली़ यात वाढीव कामे करण्यास कंत्राटदारांना सांगण्यात आले; पण त्या कामाचे देयक काढण्यात आले नाही़ ...

वाढीव कामांची देयके त्वरित द्या
वर्धा : जि़प़ बांधकाम विभागाने २०१४-१५ मध्ये एफडीआर कामे करून घेतली़ यात वाढीव कामे करण्यास कंत्राटदारांना सांगण्यात आले; पण त्या कामाचे देयक काढण्यात आले नाही़ यामुळे कंत्राटदारांत असंतोष पसरला आहे़ वाढीव कामाचे देयक त्वरित काढण्यात यावे, अशी माणगी जिल्हा कंत्राटदार समितीने केली आहे़ याबाबत जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे़
जि़प़ बांधकाम विभागाने २०१४-१५ अंतर्गत एफडीआरच्या कामांची निवीदा काढली़ सर्व नियमित कंत्राटदारांनी निविदा भरल्या़ यात कंत्राटदारांच्या दर पृथ:करणाचा अहवाल मागितला़ कंत्राटदाराने दर पृथ:करण अहवाल सादर करून गुणवत्तेची कामे करण्याची हमी दिली़
सदर कामांचा करारनामा करण्यास बांधकाम विभागातर्फे वित्त विभाग व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कामाचे करारनामे मंजुरी प्रदान करण्यासाठी सादर केले जाते; पण त्यावेळी वित्त विभाग वा अतिरिक्त कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सदर निविदा कमी टक्के दराने आढळत असल्याने वाढीव कामे करण्यास बांधकाम विभागास मज्जाव करणे गरजेचे होते; पण तसे केले नाही़ कामे करण्यास मनाई केल्यानंतरही बांधकाम विभागाने सदर आदेश पाळला नसेल तर यात कंत्राटदारांचा काय दोष, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ कंत्राटदाराने जर स्व-मर्जीने वाढीव कामे केली असती तर केलेल्या कामाचे मोजमाप शाखा अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांनी तांत्रिक प्रमाणित केले नसते. यामुळे यात बांधकाम व वित्त विभाग दोषी आहे़ असे असले तरी कंत्राटदार भरडला जात आहे़
हा प्रकार अन्यायकारक आहे़ कंत्राटदारांनी आपल्या पैशातून कामे केली; पण त्यांना देयके दिली जात नाहीत़ याकडे लक्ष देत देयके अदा करण्याची मागणी समितीने केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)