आठ दिवसात मोबदला द्या, अन्यथा पाणी बंद
By Admin | Updated: April 18, 2015 01:51 IST2015-04-18T01:51:45+5:302015-04-18T01:51:45+5:30
टंचाईग्रस्त असलेल्या गावाला पाणी पुरवठा करण्याकरिता तालुक्यात नारा २२ ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली.

आठ दिवसात मोबदला द्या, अन्यथा पाणी बंद
कारंजा (घा.) : टंचाईग्रस्त असलेल्या गावाला पाणी पुरवठा करण्याकरिता तालुक्यात नारा २२ ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेतील पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याकरिता जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप अधिग्रहीत जमिनीचा मोबादला देण्यात आलेला नाही. त्यामुळे आठ दिवसात हा मोबदला देण्याची मागणी होत आहे
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९९१ मध्ये जमिनी अधिग्रहीत केल्या. आज त्याला २३ वर्षे लोटूनही या मोबदल्याकरिता गावाकऱ्यांना उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाला शुक्रवारी पत्र देत आठ दिवसात व्याजासह मोबदला द्या अन्यथा पाणी बंद करू असा इशारा पत्राद्वारे दिला आहे.
नारा अधिक २२ गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता पंढरी लहानु बोडखे, रा. बिहाडी यांच्या शेत सर्व्हे नं.३३३ मध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची समतोल टाकी व जलशुद्धीकरण केंद्र उभारले. यातुन २२ गावांच्या पाण्याची समस्या सुटली. या प्रकल्पाकरिता जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र मोबदल्याकरिता प्राधिकरणाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. मोबदल्याची रक्कम आल्याचे सांगण्यात येते मात्र ती दिल्या जात नाही. अखेर त्रस्त शेतकऱ्यांने आठ दिवसात व्याजासह मोबदला मिळण्याबाबत उपकार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला. याकडे वरिष्ठांनी लक्ष पुरवून त्वरित मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)