पाणी पुरवठा सुरळीत करून स्वच्छतेकडे लक्ष द्या
By Admin | Updated: May 5, 2017 01:59 IST2017-05-05T01:59:27+5:302017-05-05T01:59:27+5:30
पालिकेद्वारे प्रत्येक गुरुवारी ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ हे अभियान राबविले जात आहे; पण या उपक्रमातून शहर स्वच्छ होत नसल्याचे दिसते.

पाणी पुरवठा सुरळीत करून स्वच्छतेकडे लक्ष द्या
पुलगाव : पालिकेद्वारे प्रत्येक गुरुवारी ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ हे अभियान राबविले जात आहे; पण या उपक्रमातून शहर स्वच्छ होत नसल्याचे दिसते. आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य असतो. बसपाच्या नगर सेवकांनी आठवडी बाजाराची पाहणी करीत स्वच्छतेकडे पालिकेचे लक्ष वेधले. याबाबत न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
तत्पूर्वी सत्तेतील भाजपाच्या नगर सेविका व स्वच्छता व आरोग्य सभापती ममता बडगे यांनी नगर प्रशासनाचे स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याकडे निवेदनातून लक्ष वेधत भाजपाला घरचा आहेर दिला होता. बुधवारी विरोधी गटाचे गटनेता व बसपा नगर सेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत स्वच्छता व पाणी समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली. शहरात काही दिवसांपासून नगर प्रशासन स्वच्छता अभियान राबवित आहे; पण नियोजन नसल्याने मुख्य चौक, गांधी चौक, धर्मशाळा, इंदिरा चौक, आठवडी बाजार आदी ठिकाणी व गल्लीबोळांत नाल्यांतील घाण पडून आहे. शहराच्या काही भागात सदोष जल वाहिन्यांमुळे पाणी पुरवठा होत नसल्याची ओरड होत आहे. याबाबत बसपाचे न.प. गटनेता डॉ. प्रमोद नितनवरे, कुंदन जांभुळकर, प्रकाश टेंभुर्णे, शोभा ठवकर, करुणा राऊत, काँग्रेसचे रितेश मडावी व जमना खोडे या नगर सेवकांनी मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांना निवेदन साद केले. लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.(तालुका प्रतिनिधी)