प्रकल्पाचे काम रखडल्याने रस्त्याची दैना
By Admin | Updated: August 13, 2016 00:43 IST2016-08-13T00:43:58+5:302016-08-13T00:43:58+5:30
शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेतलेल्या शिरूड प्रकल्पाचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे

प्रकल्पाचे काम रखडल्याने रस्त्याची दैना
शिरुड-इंझाळा रस्ता उखडला : सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल
हिंगणघाट : शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेतलेल्या शिरूड प्रकल्पाचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. प्रकल्पाचे काम पावसाळ्यामुळे बंद असल्याने प्रकल्पाजवळील इंझाळा ते शिरूड या मार्गाची अवस्था या प्रकल्पामुळे अत्यंत दयनीय झाली आहे.
हा रस्ता जागोजागी तुटलेला आहे. रस्त्यात मोठेमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे खड्ड्यांत हा रस्ता शोधावा लागत आहेत. एक एक फुट चिखल आणि गाळातून ग्रामस्थांना ये-जा करावी लागत आहे. यासंदर्भात तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्या आहेत. परंतु वर्ष लोटूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे शिरूड येथील ग्रामस्थ मोठा संताप व्यक्त करीत आहेत.
हिंगणघाट जवळील शिरूड या गावात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे शिरूड लघु पाटबंधारे प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या परिसरातील शिरूड-इंझाळा हा रस्ता प्रकल्पाच्या हद्दीत सापडल्याने दुसरा पर्यायी मार्ग बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पर्यायी मार्गाचे प्राथमिक कार्यही करण्यात आले. परंतु प्रकल्पाच्या अर्धवट कामामुळे हा रस्त्याही अर्धवटच आहे.
नवीन मार्गाचे काम सुरू झाल्याने जुना रस्ता दुर्लक्षित झाला. त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले. परंतु नवीन पर्यायी मार्गही मातीचाच असल्याने पावसामुळे त्यावर दोन फुटापर्यंत चिखल साचला आहे. शिरूडवासीयांना इंझाळ्याकडे नेहमीच जावे लागते. अनेकांची शेती सुद्धा याच मार्गावर असल्याने शेतात कसे जावे हा प्रश्न नागरिकांना पडतो. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
यासंबंधीची तक्रार हिंगणघाटच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर शिरूडकडून इंझाळ्याकडे जाताना गावाजवळच नाला ओलांडून जावे लागते. पावसाळ्यात या नाल्याला पाणी असल्याने ये-जा करणे अत्यंत कठीण आणि धोक्याचे झाले आहेत. येथे पूल बांधण्याची मागणीही मागील वर्षीच करण्यात आली. परंतु निद्रिस्त अवस्थेतीत अधिकारी लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांत प्रचंड संताप व्यक्त होतो.(शहर प्रतिनिधी)
दोन्ही रस्त्यांमुळे मनस्ताप
शिरूड प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने शिरूड-इंझाळा रस्त्याची पूर्णत: दैना झाली. प्रकल्पात हा रस्ता सापडल्याने दुसरा पर्यायी मार्ग बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
पर्यायी मार्गाचे प्राथमिक कार्यही करण्यात आले. परंतु प्रकल्पाच्या अर्धवट कामामुळे हा रस्त्याही अर्धवटच आहे. नव्या मार्गाचे काम सुरू झाल्याने जुना रस्ता दुर्लक्षित झाला. त्यावर जागोजागी मोठमोठी खड्डे पडले. परंतु नवीन पर्यायी मार्गही मातीचाच असल्याने पावसामुळे त्यावर दोन फुटापर्यंत चिखल साचला आहे.