डॉक्टरविना उपचारार्थ रुग्णांची पायपीट
By Admin | Updated: August 11, 2016 00:35 IST2016-08-11T00:35:27+5:302016-08-11T00:35:27+5:30
नजीकच्या सालई (कला) आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सालई (पेवट) येथील आयुर्वेदिक रुग्णालयात एक महिन्यापासून डॉक्टर नाही.

डॉक्टरविना उपचारार्थ रुग्णांची पायपीट
महिनाभरापासून डॉक्टरच नाही : पर्यायी डॉक्टरची व्यवस्था करण्याची मागणी
बोरधरण : नजीकच्या सालई (कला) आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सालई (पेवट) येथील आयुर्वेदिक रुग्णालयात एक महिन्यापासून डॉक्टर नाही. त्यामुळे सालई सह गोहदा येथील नागरिकांना पायपीट करीत अन्य ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागत आहे.
सालई(पेवट)हे गाव जंगलव्याप्त भागात आहे. जवळपास दीड हजार नागरिक येथे वास्तव्यास आहेत. रुग्णांच्या उपचारार्थ येथे आयुर्वेदिक रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. परंतु येथील डॉक्टर प्रशांत वाडीभस्मे यांना महिनाभरापासून तालुक्यातील दहेगाव येथे पाठविण्यात आले आहे. परंतु यादरम्यान सालईसाठी पर्यायी डॉक्टरची व्यवस्था करण्यात आलेली नाही.
सध्या आजारांचे थैमान सुरू आहे. सर्वत्र खोकला, ताप, सदी, अंग दुखणे, यासारख्या आजाराने थैमान घातले परंतु डॉक्टरच नसल्याने रुग्णांना रात्री बेरात्री सात किमीची पायपीट करीत हिंगणीला किंवा सालई(कला) आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावा लागतो. आयुर्वेदिक दवाखाना असूनही डॉक्टरअभावी तो शोभेची वास्तू बनला आहे.
बोर व्याघ्र प्रकल्प गावाला लागूनच असल्याने हिंस्त्र प्राण्यांचे गावाभोवताल वास्तव्य असते. सरपटणारे प्राणी येथे नेहमीच नजरेस पडतात. अशावेळी इजा झाल्यास डॉक्टरअभावी हिंगणी किंवा सालई (कला) शिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने ही बाब ध्यानात घेत येथे तात्काळ डॉक्टरची नियुक्त करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांद्वारे केली जात आहे.(वार्ताहर)