पाटसऱ्या बुजल्या, ओलीतास अडथळा
By Admin | Updated: November 6, 2014 02:10 IST2014-11-06T02:10:11+5:302014-11-06T02:10:11+5:30
अप्पर वर्धा धरण अंतर्गत, उर्ध्व वर्धा डावा कालवा, कडा पाटसऱ्या विभाग हे दरवर्षी रब्बी पिकांसाठी ओलीत करायला पाणी सोडतात.

पाटसऱ्या बुजल्या, ओलीतास अडथळा
अमोल सोटे आष्टी(शहीद)
अप्पर वर्धा धरण अंतर्गत, उर्ध्व वर्धा डावा कालवा, कडा पाटसऱ्या विभाग हे दरवर्षी रब्बी पिकांसाठी ओलीत करायला पाणी सोडतात. यासाठी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी आकारणीही केली जाते. परंतु शेतकऱ्यांना सुविधा मिळतातच असे नाही. यावर्षी पाणी सोडण्यापूर्वी कालवे व पाटसऱ्या साफ करण्यात आल्या नसल्याचे प्रत्यक्ष पाहणी केली असता आढळून आले. त्यामुळे सोडलेले पाणी शेतात कमी आणि वायाच जास्त जात आहे. साफसफाई करणारे पगारी कर्मचारी ड्यूटी सोडून टाईमपास करण्यात व्यस्त असल्याचे वास्तवही ‘आॅन दी स्पॉट’ पाहणी केली असता आढळून आले.
आष्टी(श.) तालुक्यासाठी तळेगाव (श्या.पं.) येथे दोन कार्यालय कार्यरत आहे. कालव्यासाठी आणि पाटसऱ्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. या अंतर्गत १२ हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित राहते. धरणात १०० टक्के पाणीसाठा असल्यामुळे मुबलक पाणी शेतकऱ्यांना मिळण्याची आशा होती. त्यासाठी कालवे विभागाचे उपविभागीय अभियंत्रा व्ही.एम. गावंडे, कडा विभागाचे उपविभागीय अभियंता पी. पी. पोटफोडे यांनी पाणीवाटप संस्थाचे अध्यक्ष, सदस्य यांसोबत सभा घेवून नियोजन केले. यासंबंधी कार्यरत साफसफाई कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली. मात्र अद्यापही कालव्याची व पाटसऱ्याची सफाई झाली नाही. गाजरगवत, बाभळीची झुडप वाढली आहेत. पाण्यासोबत वाहत येणारा कचरा साचल्याने शेताजवळ आलेले पाणी भलतीकडेच वाहत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली त्यांच्या शेताजवळही अद्यापही पाणी पोहचले नाही. अनेक शेतकऱ्यांनी चोरीच्या मार्गाने पाणी घेतले आहे. त्यांना साफसफाई कर्मचारी चिरीमिरी घेवून मदत करीत असल्याचा अआरोप होत आहे. अधिकाऱ्यांचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पाहणीत समोर आले.
आष्टी, तळेगाव, भारसवाडा, लहान आर्वी, अंतोरा, साहूर या भागात मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. पण राबविणारी यंत्रणा कमी पडत असल्यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. यावर्षी खरिपावर आधारित सोयाबीन पीक पूर्णत: बुडाले. शेतकऱ्यांनी वातावरणात आर्द्रता नसल्याने हरभरा, गहू, पिकांची पेरणी कमी प्रमाणात केल्या जात आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सुविधा आहे. त्यांना पीक येण्याची हमी आहे. मात्र ओलितासाठी लागणारे पाणी शेतापर्यंत पोहचत नसल्याने अनेक शेतकरी चिंतीत आहे. आमदार अमर काळे यांनी अप्पर वर्धा धरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. सद्यस्थितीत धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातील ३० टक्के पाण्याची चोरी होत आहे. ३० टक्के पाणी अस्वच्छतेमुळे वाया जात आहे, तर थोड्याशा पाण्यावर पिकांना ओलित करावे लागत आहे. सोबतच आष्टी तलाव, मलकापूर तलावांतर्गत असणारे कालवे व पाटसऱ्याची अद्याप सफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी बरीच कसरत करावी लागत आहे. शासनाने बांधकामावर कोट्यावधी रूपयांचा खर्च केला. परंतु देखभाल व संरक्षणात कुचराई होत असल्यामुळे मूळ उद्देश अपूर्ण रहात आहे. आर्वी व आष्टी तालुक्यात सारखीच स्थिती आहे. शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी केली तरच याचा फायदा होणार आहे. तसे होताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.