बायपास बसेसबाबत प्रवाश्यांत असंतोष
By Admin | Updated: November 15, 2015 01:30 IST2015-11-15T01:30:22+5:302015-11-15T01:30:22+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या पुलगाव मार्गे जाणाऱ्या वा येणाऱ्या बसगाड्या बरेचदा देवळी स्थानकाला न येता परस्पर बायपासने जातात.

बायपास बसेसबाबत प्रवाश्यांत असंतोष
पत्रव्यवहारही निष्फळ : ग्रामस्थांची ताटकळ
देवळी : राज्य परिवहन महामंडळाच्या पुलगाव मार्गे जाणाऱ्या वा येणाऱ्या बसगाड्या बरेचदा देवळी स्थानकाला न येता परस्पर बायपासने जातात. यामुळे प्रवाश्यांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी वर्धा व चंद्रपूरच्या आगारप्रमुखांशी चर्चा केली. शिवाय पत्रव्यवहारही केला; पण त्याचा उपयोग होत नसल्याचेच दिसते.
महामंडळाच्या आगारप्रमुखांनी बसस्थानकावर बसेस नेण्याबाबतचे आदेश दिले; पण त्यांच्या आदेशाला न जुमानता चालकांकडून अरेरावी केली जात आहे. याचा विपितर परिणाम प्रवाश्यांवर होत आहे. पुलगाव चौकात उतरवून दिल्यानंतर अनेकांना सोबतच्या साहित्यासह बसस्थानकावर पायदळ जावे लागते. याबाबत ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक दिवस पुलगाव चौकात उपस्थित राहून वाहन चालकांना समज दिला. महामंडळाच्या वरिष्ठांचे आदेश दाखविले; पण याचा काही उपयोग झाला नाही. यामुळे वर्धा व पुलगाव बसस्थानकावर तत्सम फलक लावून प्रवाश्यांचा संभ्रम दूर करण्यात यावा, प्रत्येक चालकाला देवळी बस स्थानकावर लॉगसीटवर नोंद घेणे सक्तीचे करावे, आदी मागण्या ग्राहक पंचायतने केल्या आहेत. याबाबतचे निवेदन आगार प्रमुखांना देण्यात आले. शिष्टमंडळात विश्वनाथ खोंड, प्रवीण फटिंग, नारायण चव्हाण, मनोहर सुरकार, भीमराव कडू आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)