‘सुपर’ गाड्या ‘आॅर्डिनरी’ केल्याने प्रवासी त्रस्त
By Admin | Updated: November 11, 2014 22:46 IST2014-11-11T22:46:39+5:302014-11-11T22:46:39+5:30
भंगारगाड्या व विस्कळीत वेळेसाठी ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी आगाराने सामान्य प्रवाशांच्या त्रासात भर टाकत आर्वी नागपूर तसेच आर्वी अमरावती या मार्गावरील अनेक गाड्या

‘सुपर’ गाड्या ‘आॅर्डिनरी’ केल्याने प्रवासी त्रस्त
आर्वी : भंगारगाड्या व विस्कळीत वेळेसाठी ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी आगाराने सामान्य प्रवाशांच्या त्रासात भर टाकत आर्वी नागपूर तसेच आर्वी अमरावती या मार्गावरील अनेक गाड्या सुपरवरून आॅर्डिनरी केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आर्र्वी आगारातून आर्वी-नागपूर साठी दररोज काही गाड्या सोडल्या जातात. हे अंतर जवळपास १२० किमीचे आहे. तसेच आर्वी-अमरावती हे अंतरही ६० ते ७० किमीच्या आसपास आहे. आर्वी आगाराच्या या मार्गावरील अनेक बसफेऱ्या या सुपर वरून आर्डनरी केल्याने प्रवाशांचा चांगलाच संताप होत आहे.
आर्र्वी नागपूर हे १२० कि़मीचे अंतर सुपर गाडीने जाण्यालाही अडीच ते तीन तासांचा अवधी लागतो. त्यात आर्वी वरून थेट नागपूरला कामानिमित्त व्यापारी नोकरदार, शासकीय कार्यालयीन कामाकाजासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने या गाड्या आॅर्डिनरी केल्याने प्रवाशांना आर्वी तळेगाव पर्यंत जाऊन तळेगावला उतरून दुसऱ्या डेपोची गाडी पकडावी लागते. यात लांबपल्याच्या गाड्या असल्याने प्रवाशांना गाडीत बसण्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांचा सध्या चांगलाच संताप होत आहे. त्याचप्रकारे आर्वीवरून अमरावती येथे जास्त असलेल्या प्रवाशांची संख्या ही मोठी आहे. या मार्गावरीलही अनेक बसफेऱ्या या आॅर्डिनरी केल्याने या मार्गावरील नागरिकही संताप व्यक्त करीत सुपर बसेस पूर्ववत कराव्या किंवा बसेस वाढवाव्या, अशी मागणी होत आहे.
आर्वी तालुका व उपविभागीय कार्यालयाचे ठिकाण असलेल्या आर्वी परिवहन विभागाकडे ६१ बसगाड्या असून दिवसभरात ५८ बसफेऱ्याचे वेळापत्रक आहे तर २७ हजार प्रवासी रोज या बसफेऱ्यातून प्रवास करून आर्र्वी आगाराला साडेचार ते पाच लाखांचा दररोजची आवक आहे. आर्वीवरून नागपूरला जाण्यासाठी रोज जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आर्र्वीतून सर्वाधिक असल्याने आर्वी नागपूर हा सुपर प्रवास आर्वी तळेगाव पर्यंत करून प्रवाशांना तळेगाव वरून दुसरी गाडी पकडावी लागते.
आर्र्वी आगाराने लांब पल्यांच्या गाड्या आॅर्डिनरी केल्याने सध्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. आर्वी नागपूर या सुपर गाड्या प्रमाणेच आर्र्वी अमरावती, आर्वी वर्धा या मार्गावरील सुपर गाड्या आॅर्डिनरी केल्याने सामान्य प्रवाशांची सध्या चांगलीच पंचाईत व मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या आॅर्डिनरी गाड्यामुळे परिवहन विभागाचे वेळापत्रक कोलमडत आहे. या गाडीतून प्रवास करणाऱ्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही नियोजित वेळेत शाळा व महाविद्यालयात पोहचण्यास उशिर होत आहे. या सर्व सुपर गाड्या पूर्ववत करण्याची प्रवाशांची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)