वृक्षलागवड मोहिमेत सहभागी व्हा
By Admin | Updated: June 12, 2016 01:52 IST2016-06-12T01:52:22+5:302016-06-12T01:52:22+5:30
राज्यात २ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ जुलै रोजी सुमारे ७ लक्ष ४० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वृक्षलागवड मोहिमेत सहभागी व्हा
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : जिल्ह्यात ७.४० लाख झाडे लावणार
वर्धा : राज्यात २ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ जुलै रोजी सुमारे ७ लक्ष ४० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना साकार करण्यासाठी जनतेने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
राज्यात १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षलागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातही ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी नवाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुख तसेच स्वयंसेवी संस्थेची बैठक आयोजित करण्यात आली.
वृक्षरोपण मोहिमेत वन विभाग, सामाजिक वनीकरण, महसूल व इतर सर्व विभाग प्रमुख, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, निसर्ग सेवा समिती आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून मोहीम यशस्वी करण्यात येणार असून एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्व जनतेचेही सहकार्य आवश्यक आहे. जिल्ह्यात वृक्षरोपण मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षरोपणासाठी झाडे उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवाल यांनी यावेळी दिल्या.
१ जुलै रोजी वृक्षलागवड करण्याबाबत वन विभागास जंगलक्षेत्रातील ५८ रोपवनस्थळी एकूण ४ लक्ष ९९ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभाग २० हजार असून शासनाचे २० विभाग व त्याअंतर्गत यंत्रणांना २ लक्ष २० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभागाकडे इतर विभाग व यंत्रणांसाठी वर्धा वनपरिक्षेत्र, गांधीबाग, रोपवाटिका, वर्धा, हिंगणी वनपरिक्षेत्र, हिंगणी रोपवाटिका, समुद्रपूर वनपरिक्षेत्र, मोहगाव रोपवाटिका, आष्टी वनपरिक्षेत्र, पिलापूर रोपवाटिका, तळेगाव वनपरिक्षेत्र, जसापूर रोपवाटिका, कारंजा वनपरिक्षेत्र, आमझरी रोपवाटिका, आर्वी वनपरिक्षेत्र, सारंगपुरी रोपवाटिका, खरांगणा वनपरिक्षेत्र, खरांगणा रोपवाटिका येथे उपलब्ध आहे.
वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच इतर सर्व यंत्रणेचे अधिकारी यांनी नियोजन केले आहे. जिल्हास्तरावर व प्रत्येक तालुक्याकरिता एक तालुका समन्वयक लागवड अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हा समन्वयक म्हणून सामाजिक वनिकरणचे उपसंचालक यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. वृक्ष लागवड मोहिमेत जास्तीत जास्त लोकसहभाग व्हावा या दृष्टीने वन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रोप लागवड कार्यक्रमामध्ये लोकप्रतिनिधी, संस्थाचे पदाधिकारी, विद्यार्थी, सरपंच, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था आणि जिल्ह्यातील नागरिकांचा सहभाग असणार आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, सामाजिक वनिकरणचे तळवेकर उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)