अर्धवट मोजणी; भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांची सावरासावर
By Admin | Updated: March 20, 2015 01:47 IST2015-03-20T01:47:16+5:302015-03-20T01:47:16+5:30
शेतकऱ्यांना मंदिराकरिता दान द्यावयाच्या जमिनीची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अर्धवटच केली़ ...

अर्धवट मोजणी; भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांची सावरासावर
वर्धा : शेतकऱ्यांना मंदिराकरिता दान द्यावयाच्या जमिनीची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अर्धवटच केली़ याबाबतच्या तक्रारीनंतर पुन्हा मोजणीचा फार्स झाला; पण ती पूर्ण करून देण्यात आली नाही़ आता अधिकारी, कर्मचारी सावरासावर करीत असून कर्मचाऱ्यांची पाठराखन केली जात असल्याचे दिसते़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
सरूळ येथील शेतातील प्लॉट क्र. ०३ आर सर्व्हे क्र. १६५ हा प्लॉट बळीराम गावंडे यांचा आहे़ सध्या तेथे जनावरे बांधली जातात़ सदर जागा विठ्ठल-रूख्मिनी मंदिर बांधण्यासाठी देण्याचा निश्चय शेतकऱ्याने केला आहे़ यासाठी पूर्ण मोजमाप करून सदर जमीन मंदिराला दान करावी म्हणून त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय देवळी येथे रितसर अर्ज केला़ शासन नियमानुसार शुल्कही अदा केले. यानंतर भूमी अभिलेख कार्यालयातून एन.सी. जाधव हे प्लॉट मोजणी करून देण्यासाठी आले़ त्यांनी अर्धवट मोजणी केली व शेतकऱ्याच्या सह्या घेतल्या़ उर्वरित मोजणी गुरूवारी केली जाईल, असे सांगून अधिकारी गेले ते परतलेच नाही़ भमणध्वनीवर संपर्क साधला असता मोजणी करून देण्यास नकार देऊन शिवीगाळही करण्यात आली़
याबाबत शेतकऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली; पण उपयोग झाला नाही़ यानंतर लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पुन्हा अधिकारी आले; पण व्यवस्थित मोजणी केली नाही़ यात अधिकारीही कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असून कारवाईची माणगी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)
भूमी अभिलेख कर्मचाऱ्याने अर्धवट मोजणी केली; पण सदर मोजणी व्यवस्थित असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. पाहणी करण्यासाठी कराड यांना पाठविण्यात आले असता त्यांनीही कर्मचाऱ्यांची बाजू राखण्याचाच प्रयत्न केला़ सदर जागा मंदिरासाठी दान देत असल्याने मोजणी न झाल्यास भूमी अभिलेख वर्धा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी गावंडेसह ग्रामस्थांनी दिला आहे़ पाहणी करूनही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़
शेतकऱ्याची कुचंबना
शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतरही अधिकाऱ्यांना जाग आली नाही; पण लोकमतने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वर्धा यांनी सोमवारी उपअधीक्षक भूमी अभिलेख देवळी यांना घटना स्थळावर चौकशीसाठी पाठविले़ यावरून जे.बी. कराड यांनी जागेची पाहणी केली़ यावेळी त्यांनी मोजणी केली आहे व व्यवस्थित केली आहे, तुमच्या जागेतच तफावत असल्याचे सांगण्यात आले. यावरून उपअधीक्षक भूमी अभिलेख कराडे हे कर्मचारी जाधव यांना पाठीशी घालत असून शेतकऱ्याची कुचंबना झाली आहे़
जाधव यांनी अर्धवट मोजणी केली असताना अधिकारी व्यवस्थित मोजणी केल्याचे सांगत आहेत़ यावरून अधिकारीही कर्मचाऱ्यांची पाठराखन करीत असल्याचे दिसते़ सदर जमिनीची त्वरित मोजणी करून द्यावी, अशी मागणी बळीराम गावंडे, मुकेश गावंडे, निलेश रानोटे, राजेंद्र सावरकर, महेंद्र गावंडे, वसंत रानोटे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे़