खडकी येथे वाहनतळाची मागणी
By Admin | Updated: November 16, 2016 01:00 IST2016-11-16T01:00:08+5:302016-11-16T01:00:08+5:30
नागपूर राज्य मार्गावर असलेल्या खडकी येथे भाविकांची गर्दी लक्षात घेता येथे वाहनतळाची निर्मिती करण्यात यावी,

खडकी येथे वाहनतळाची मागणी
सेलू : नागपूर राज्य मार्गावर असलेल्या खडकी येथे भाविकांची गर्दी लक्षात घेता येथे वाहनतळाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे़ अद्याव यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
वर्धा-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सेलडोह गावालगत खडकी हे गाव आहे़ नागपूर मार्गावरच हनुमंताचे पुरातन व प्रसिद्ध देवस्थान आहे़ नवसाला पावणारा मारूतीराया म्हणून या देवस्थानाची प्रसिद्धी आहे़ येथे नागपूर व वर्धा जिल्ह्यातून नियमित शेकडो भाविक हजेरी लावतात़ या मार्गावरून विदर्भातील इतर जिल्ह्यात जाणारी असंख्य खासगी वाहने प्रवासादरम्यान थांबतात़ हनुमंताचे देवस्थान रस्त्यालगत असल्याने माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसह प्रवासी वाहतूक करणारी वाहनेही रस्त्यावर उभी केली जातात़ रस्त्याच्या एका बाजूला देवस्थान तर दुसऱ्या बाजूला उपहारगृहे आहे. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी होते. विशेष म्हणजे शनिवार व मंगळवारी येथे जास्त गर्दी होत असून रस्त्यावर उभी राहणारी वाहने इतर वाहनांकरिता मनस्ताप ठरत आहेत़ अनेकदा येथील वाहतूक ठप्प होत असून दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागतात़ या प्रकाराला आळा घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने देवस्थानालगतच्या भागात वाहनतळाची निर्मिती करणे गरजेचे झाले आहे़
यामुळे रस्त्यावर उभी होणारी वाहने वाहनतळावर उभी केली जातील़ यातून येथे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण टाळता येणे शक्य आहे. यासह अन्य वाहनांना आवागमनाकरिता मार्ग मोकळा होईल़ प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही़ यामुळे नाइलाजास्तव वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याचे दिसून येते. येथे वाहनतळाची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)