विद्यार्थ्यांनी बनविले पेपर रिसायकलिंग मशीन
By Admin | Updated: May 19, 2016 01:45 IST2016-05-19T01:45:26+5:302016-05-19T01:45:26+5:30
दत्ता मेघे अभियांत्रिकी विद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पेपर पासून टिकाऊ पेपर बनविण्याची मशीन बनविली आहे.

विद्यार्थ्यांनी बनविले पेपर रिसायकलिंग मशीन
आविष्कार : वृक्षतोड कमी करण्यासाठी सहायक
वर्धा : दत्ता मेघे अभियांत्रिकी विद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पेपर पासून टिकाऊ पेपर बनविण्याची मशीन बनविली आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक जगातील गरज व टाकाऊ पेपरचा उपयोग व्हावा ही बाब लक्षात घेऊन सदर उपकरण तयार केले आहे.
नवीन पेपर बनविण्यासाठी झाडांचा उपयोग होतो. त्यामुळे असंख्य झाडांची दररोज कत्तल होते. ही वृक्षतोड कमी करण्यासाठी टाकाऊ पेपर पासूनच कसा टिकाऊ पेपर बनविण्यात येईल याचा शोध विद्यार्थ्यांनी लावला आहे. यावर अधिक संशोधन करून सामान्य नागरिकांसाठी ही मशीन कशी फायद्याची ठरू शकते यावर संशोधन सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या मशीनचा उपयोग पेपर उद्योगासाठी होऊ शकतो.
या प्रकल्पाला मॅकेनिकल विभागाचे प्रमुख प्रा. धनंजय इखार, प्रा. रूपेश तेलरांधे यांनी मार्गदर्शन केले. हा प्रकल्प जुबेर पठाण, नचिकेत भोगावर, शीतल खडसे, अनंतकुमार चाहारे, अंशुल दांडेकर, यश प्रितम भांडेकर यांनी तयार केला. या प्रकल्पासाठी दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन उंटवाले यांनीही मार्गदर्शन केले. हा प्रकल्प ग्रामीण जनतेला व पेपर उद्योगाला लाभदायक ठरणार असल्याचे मत उंटवाले यांनी व्यक्त केले.(शहर प्रतिनिधी)