‘त्या’ फलकाकडे पंचायत समितीचे दुर्लक्ष
By Admin | Updated: April 2, 2017 00:46 IST2017-04-02T00:46:20+5:302017-04-02T00:46:20+5:30
येथील पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावलेला नागरिकांची सनदचा डिजीटल फलक फाटलेल्या अवस्थेत आहे.

‘त्या’ फलकाकडे पंचायत समितीचे दुर्लक्ष
दर्शनी भागावर फाटका फलक : बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांची नावेही कायम
सेलू : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावलेला नागरिकांची सनदचा डिजीटल फलक फाटलेल्या अवस्थेत आहे. मागील चार महिन्यांपासून या फलकाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे.
नागरिकांना कार्यालयात आल्यानंतर कोणत्या कामासाठी कुणाला भेटावे, याची माहिती फलकावर दिलेली आहे. कोणत्या कामासाठी कोणते अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत, त्यांच्या कामाचा कार्यपूर्तीचा कालावधी किती, विहित मुदतीत कार्यपूर्ती न झाल्यास कोणत्या अधिकाऱ्याकडे तक्रार करावी हे दर्शविणारा लांबलचक फलक प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे; पण येथील फलकाची दुरवस्था झाली आहे.
फलकाकडे दुर्लक्ष होत असतानाच या फलकावरील गटविकास अधिकारी ए.के. तेलंग, सहायक गटविकास अधिकारी एन.टी. खेरे, वरिष्ठ सहायक महेंद्र तडस, आर.जी. कंडे, विस्तार अधिकारी आर.डी. कांबळे, पंचायत विस्तार अधिकारी, जी.एल. माने, कृषी अधिकारी एन.आर. किटे, विस्तार अधिकारी टी.एस. सातघरे यांची नावे कायम आहेत. हे अधिकारी बदली होवून अन्यत्र रूजू झाले आहेत. यातील एन.आर. किटे हे एक वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेत तर टी.एस. सातघरे, कारंजा पंचायत समितीमध्ये सहायक गटविकास अधिकारी, आर.डी. कांबळे वर्धा पंचायत समितीत तर जी.एस. माने आर्वी पं.स. मध्ये कार्यरत आहेत.
शासनाने नागरिकांची सनद या शिर्षकाखाली नागरिकांना कार्यालयात आल्यावर माहिती अवगत व्हावी म्हणून लावलेल्या फलकाकडे दुर्लक्ष करण्यात आले. कार्यालयात आल्यावर नागरिकांना फलकावरील नावाची व्यक्तीच येथे कार्यरत नसल्याने विचारणा करावी लागते. फलकावरील माहिती अद्यावत करण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)
माहिती अद्यावत करण्याचा विभागाला पडला विसर
अधिकारी व पदाधिकारी बदलून आल्यास त्यांच्या नावाची पाटी त्वरित बदलली जाते; पण नागरिकांच्या कामाशी संलग्नित असणाऱ्या या फलकावरील अधिकाऱ्यांची नावे बदलविण्यात दिरंगाई केली जात आहे.
महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या फलकाकडे होत असलेले दुर्लक्ष शोकांतिकाच असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांतून उमटत आहेत. हा फाटलेला फलक त्वरित दुरूस्त करावा, अशी मागणीही होत आहे.
नागरिकांना कार्यालयात आल्यानंतर कोणत्या कामासाठी कुणाला भेटावे, याची विचारणा करावी लागत आहे. फलकावर अद्यावत माहिती नसून फलक फाटला असल्याने त्यावरील मजकूर दिसेनासा झाला आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता फलकाची दुरुस्ती करणे गरजेचे ठरत आहे.