कौंडण्यपूरची पालखी निघाली पंढरपूरला
By Admin | Updated: June 15, 2014 23:41 IST2014-06-15T23:41:49+5:302014-06-15T23:41:49+5:30
विदर्भातील एकमेव तीर्थक्षेत्र असलेल्या कौंडण्यपूर येथील रूख्मिणी मातेची पालखी आषाढी यात्रेकरिता श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी रवाना झाली आहे़ या पालखीचे नेतृत्व गुरूवर्य हभप रंगराव महाराज टापरे करीत आहेत़

कौंडण्यपूरची पालखी निघाली पंढरपूरला
पाऊले चालती़़़ : वारकऱ्यांना लागले विठ्ठलाच्या दर्शनाचे वेध
टाकरखेड : विदर्भातील एकमेव तीर्थक्षेत्र असलेल्या कौंडण्यपूर येथील रूख्मिणी मातेची पालखी आषाढी यात्रेकरिता श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी रवाना झाली आहे़ या पालखीचे नेतृत्व गुरूवर्य हभप रंगराव महाराज टापरे करीत आहेत़
पंढरपूर येथील आषाढी यात्रेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या पायदळ दिंडी पालखीचा प्रवास एक महिन्याचा आहे़ या प्रवासादरम्यान रात्रीचा मुक्काम मिर्चापूर, मार्डी, अमरावती, बडनेरा, लोणी, धनज खुर्द, वाढोणा, कारंजा (लाड), शिवनी, मंगरूळनाथ, कासोडा, वाशिम, कन्हेरगाव, भांडेगाव, हिंगोली, ओंढा, हट्टा, नया मोठा, दैठना, गोदातट, परभणी, परळी, बैजनाथ, अंबेजोगाई, पळसखेडा, कळंब, कन्हेरवाडी, पाथरी, बार्शी, खांडवी, माढा, शेतफळ, बाभुळगाव व ४ जुलै रोजी पंढरपूर येथे प्रवेश, असा आहे़ या दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक मंडळी सहभागी झाली आहे़ पंढरपूर यात्रेसाठी टाळ-मृदंगाच्या तालावर विठ्ठल-रूख्मिणी मातेचा गजर करीत मोठ्या आनंदाने पायी प्रवास करीत आहेत़
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निघालेल्या पालखीचा ज्या ठिकाणी रात्री मुक्काम आहे, त्या गावातील नागरिकांनी अन्नदान, अल्पोपहार आणि चहापाण्याची व्यवस्था केली आहे़ शिवाय या दिंडी सोहळ्यातील भाविक व वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याकरिता विठ्ठल रूख्मिणी संस्थान कौंडण्यपूरचे विश्वस्त वासुदेव दौंड, सचिव नामदेव अमाळकर तसेच संचालक सदस्य विशेष लक्ष देत सहकार्य करीत आहे़ पालखी सहायक हभप नरेंद्र महाराज वानखडे, ज्ञानेश्वर महाराज पांडे व वारकरी मंडळी मार्डी सहकार्य करीत आहेत़ कौंडण्यपूरहून निघालेल्या माता रूख्मिणीच्या या पायदळ वारीने परिसरातील वातावरणही भक्तीमय झाले होते़(वार्ताहर)