पंचायत समितीने पुन्हा घेतला ताडपत्रीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2015 02:29 IST2015-06-14T02:29:21+5:302015-06-14T02:29:21+5:30
तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाला पावसाळ्यात कार्यालय गळू नये, याची प्रत्येक वर्षी चिंता असते.

पंचायत समितीने पुन्हा घेतला ताडपत्रीचा आधार
सेलू : तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाला पावसाळ्यात कार्यालय गळू नये, याची प्रत्येक वर्षी चिंता असते. यासाठी यंदाही ताडपत्रीचा आधार घेण्यात आला आहे. संपूर्ण कार्यालयावर ताडपत्रीचे आच्छादन करण्यात आले आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या तालुक्यातील पंचायत समितीची इमारत जीर्ण झाली आहे. ग्रामविकासासाठी शासनाच्या लाखो रुपायांच्या योजनांचे वितरण करणारी इमारत शासनस्तरावर दुर्लक्षित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ५३ वर्षे जुन्या इमारतीवरील कवेलू फुटले असून मागील पावसाळ्यात कार्यालयात धारा लागल्या होत्या. त्या वेळीही इमारतीवर ताडपत्री झाकून गळती बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता एक वर्षाचा काळ लोटला असताना इमारतीवरील कवेलू बदलण्यासाठी कुणीही पुढाकार का घेतला नाही, हा संशोधनाचा विषय आहे. मृग नक्षत्राला सुरूवात झाली असून मृगसरी बरसल्या नसल्या तरी मृगछाया पडत आहे. गुरूवारी ढगाळ वातावरण होताच दुपारपासूनच या कार्यालयावर ताडपत्री टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. कार्यालयात गटविकास अधिकारी कार्यालय, आस्थापना, पंचायत, लेखा व कृषी विभाग असून रेकार्ड रूम आहे. मागील पावसाळ्यात पशुधन व शिक्षण कार्यालयात गळणाऱ्या ठिकाणी बादल्या व प्लास्टिक कटोरे ठेवून पाणी जमा करण्याची वेळ आली होती. त्याही कार्यालयांची दुरूस्ती करण्यात आली नाही. यंदा त्याही कार्यालयांवर ताडपत्री टाकली जाण्याची शक्यता आहे. शासकीय इमारतींची अत्यंत दयनिय अवस्था झाली असताना शासन, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी)