आजगावच्या पुलाची दैना
By Admin | Updated: May 25, 2016 02:23 IST2016-05-25T02:23:44+5:302016-05-25T02:23:44+5:30
आजगाव हे वायगाव (नि.) ग्रामपंचायतचा एक वॉर्ड असून येथील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

आजगावच्या पुलाची दैना
प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष : अपघाताच्या घटनांत वाढ
वर्धा : आजगाव हे वायगाव (नि.) ग्रामपंचायतचा एक वॉर्ड असून येथील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. वायगाव(नि.)पासून दोन किमी अंतरावर असलेले आजगाव हिंगणघाट-देवळी या मार्गावर असल्याने या रस्त्याला जोडण्यासाठी गाव नाल्यावर पूल बांधण्यात आला. मात्र हा पूल अतिवृष्टीत वाहून गेला. तीन वर्षांपासून पुलाची साधी डागडुजी करण्यात आली नाही.
या मार्गावरील वाहतूक प्रभावीत झाली आहे. तीन वर्षांपूर्वी हा पूल खचला होता. वायगाव(नि.) ग्रामपंचायतीने येथे दगड व मुरुम टाकला होता. मात्र पहिल्याच पावसात दगड व मुरुम पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. यानंतर कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. आठ वर्षांपूर्वी या पुलाचे बआंधकाम केले. मात्र काही दिवसातच या पुलाच्या लोखंडी सळाखा बाहेर आल्या होत्या. यानंतर पुराच्या प्रवाहात पुलाचा बराचसा भाग वाहुन गेला. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या पुलाची उंची वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
आजगाव मार्ग सिरसगाव(ध) येथील ग्रामस्थांना सोयीचा ठरतो. देवळी ते हिंगणघाट या मुख्य मार्गावर येण्यासाठी हा मार्ग कमी अंतराचा असल्याने वर्दळीचा आहे. आजगावसह सिरसगाव(ध) येथील ग्रामस्थांना या पुलाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील ग्रामस्थांकरिता हा पूल महत्त्वाचा आहे. याचे बांधकाम करणे गरजेचे झाले आहे. नाल्याला पूर आल्यावर गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे पूर ओसरेपर्यंत ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागते.
या पुलाच्या बांधकामाची तीन वर्र्षांपासून प्रतीक्षा आहे. अद्याप उपाययोजना करण्यात आल्या नाही. या मार्गावर किरकोळ अपघात घडतात. तुटलेल्या पुलामुळे दुचाकी घसरुन पडतात. स्थानिक प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीनी याची दखल घेत नसल्याने पुलाचे बांधकाम झाले नसल्याची ओरड ग्रामस्थ करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)
पुलाची उंची वाढविण्याची मागणी
आजगाव येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी वायगाव(नि.) आणि वर्धा येथे जातात. त्यांना याच मार्गाने जावे लागते. आजगाववासीयांना पावसाळ्यात खूप त्रास सहन करावा लागतो. नाल्याला पूर आल्यास आवागमन ठप्प होते. या पुलावर बैलबंडी घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पुलाच्यआ सळाखी बाहेर पडल्याने धोकादायक ठरत आहे. या पुलाचे त्वरीत बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.
जिल्हा परिषद आराखड्यात या पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव दिला आहे. बांधकामाला मंजुरी मिळालेली आहे. काही महिन्यातच बांधकामाला सुरुवात करण्यात येईल.
- मीना वाळके, जि.प.सदस्य, वायगाव(नि.)
या पुलाच्या बांधकामाविषयी वारंवार तक्रारी केल्या. मात्र यावर कोणीच लक्ष देत नाही. या पुलावरुन आवागमन करणे अडचणीचे झाले आहे. या पुलावर अपघातही झाले आहे. तीन वर्षांपासून ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष देण्यास तयार नाही.
- संजय मोहर्ले, ग्रामस्थ, आजगाव,