उन्हाळ्यातील वैरण टंचाईवर मात
By Admin | Updated: March 25, 2015 02:04 IST2015-03-25T02:03:54+5:302015-03-25T02:04:24+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात प्रत्येक वर्षी वैरण टंचाई भासत आली आहे. यंदा मात्र तसे नसल्याचे जिल्हा परिषदेचा अहवाल सांगत आहे.

उन्हाळ्यातील वैरण टंचाईवर मात
रूपेश खैरी वर्धा
उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात प्रत्येक वर्षी वैरण टंचाई भासत आली आहे. यंदा मात्र तसे नसल्याचे जिल्हा परिषदेचा अहवाल सांगत आहे. जिल्ह्यात वैरण निर्मितीकरिता विविध ठिकाणी मका व ठोब्यांची लागवड केल्याने गरज भागवून वैरण शिल्लक राहत आहे. छोट्या मोठ्या जनावरांकरिता एकूण ८ लाख ८० हजार २०० मेट्रीक टन वैरण आवश्यक आहे; मात्र विविध क्षेत्रातून एकूण १० लाख ७३ हजार ८५५ मेट्रीक टन वैरण तयार होत आहे. यामुळे जिल्ह्यात वैरण टंचाई निर्माण होण्याचे चिन्ह नाही. यामुळे उन्हाळ्यात जनावरांकरिता कुठेही चारा डेपो सुरू होणार नसल्याची माहिती आहे.
१९ व्या पशुगनणेनुसार जिल्ह्यात छोटी व मोठी अशी ४ लाख ८९ हजार १७३ जनावरांची नोंद जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे आहे. यात २ लाख ४४ हजार ४०३ मोठी तर २ लाख ४४ हजार ७७० छोटी जनावरे आहेत. यात गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या या वर्गातील जनावरांचा समावेश आहे. पशुवैद्यकीय अहवालानुसार मोठ्या जनावरांना दिवसाकाठी सात किलो तर छोट्या जनावरांना तीन किलो वैरण आवश्यक आहे. या मापकानुसार एकूण ८ लाख ८० हजार २०० मेट्रीक टन वैरणाची गरज आहे. ही गरज भागवूनही जिल्ह्यात सुमारे १ लाख ९३ हजार ६५५ मेट्रीक टन वैरण शिल्लक राहत असल्याचे सोमवारी समोर आले. यामुळे वैरणाच्या निर्यातिची स्थिती आहे.
वनविभागाकडून ९१,११५ मेट्रीक टन चाऱ्याची निर्मिती
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील वनविभागाच्या क्षेत्रातून एकूण ९१ हजार ११५ मेट्रीक टन वैरणाची निर्मिती होत असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अहवालात नमूद आहे. यात वर्धा तालुक्यातून १,१५७, देवळी १,१९६, सेलू ९,३२६, हिंगणघाट २,७८४, समुद्रपूर ८,४६४, आर्वी २५,२२४, आष्टी १८,३२६ तर कारंजा तालुक्यातून २४,१३८ मेट्रीक टन चाऱ्याचे उत्पादन होणार आहे.
या व्यतिरिक्त असलेल्या समुद्रपूर, आर्वी, आष्टी व कारंजा या तीन तालुक्यात असलेल्या सहा कुरणातून ९४५ मेट्रीक टन चारा निर्माण होत आहे. या चाऱ्याच्या आधारावर या भागातील जनावरे चरत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या भागात असलेल्या जंगली श्वापदांच्या हल्ल्यामुळे या भागात जनावरे जात नसल्याची ओरड आहे.
चारा टंचाई निवारणार्थ ३७.३५ लक्ष रुपयांचे अनुदान
जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होणार नाही याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने पशुसंवर्ध विभागाला उपाययोजना आखण्याकरिता एकूण ३७ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यापैकी एकूण ६ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.
खर्च झालेल्या रकमेत पशुसंवर्धन विभागाच्यावतीने २८ हजार ३२९ किलो वैरण बियाणे वाटप करण्यात आले आहेत. तर कुषी विभागाच्यावतीने एकूण १८ हजार ८०० किलो बियाणे वाटप करण्यात आले आहेत. वाटप करण्यात आलेल्या बियाण्यांचा ९४३ हेक्टरवर पेरा करण्यात आला. या व्यतिरिक्त पशुसंवर्धन विभाग व कृषी विभागाच्यावतीने ठोब्यांचे वितरणही करण्यात आले आहे. ठोब्यांचा पेरा जिल्ह्यात एकूण ७० हेक्टरवर करण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होणार नसल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त कृषी विभागाच्यावतीने मका पिकाचे बियाणे वाटप केले आहेत.