तलाव फुटण्याच्या भितीनं वर्धा जिल्ह्यातल्या दिडशे नागरिकांनी रातोरात सोडलं गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:45 IST2019-09-07T13:23:09+5:302019-09-07T13:45:17+5:30
वर्धा जिल्ह्यातील विरुळ आकाजीजवळच्या बार्हा या गावाजवळ असलेल्या कुर्हा तलाव १०० टक्के भरला असून तो कधीही फुटू शकतो या धास्तीपायी तब्बल १५० गावकऱ्यांनी रातोरात गाव सोडून अन्यत्र आश्रय घेतला आहे.

तलाव फुटण्याच्या भितीनं वर्धा जिल्ह्यातल्या दिडशे नागरिकांनी रातोरात सोडलं गाव
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यातील विरुळ आकाजीजवळच्या बार्हा या गावाजवळ असलेल्या कुर्हा तलाव १०० टक्के भरला असून तो कधीही फुटू शकतो या धास्तीपायी तब्बल १५० गावकऱ्यांनी रातोरात गाव सोडून अन्यत्र आश्रय घेतला आहे.
बार्हा गावाजवळ पाटबांधारे विभागाचा चाळीस वर्षांपूर्वीचा जुना तलाव आहे. हा तलाव सतत सुरु असलेल्या पावसाने तुडुंब भरला असून त्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच या तलावाला लागूनच जिल्हा परिषद विभागाने विहीर खणली. त्यासाठी केलेल्या ब्लास्टिंगमुळे तलावाच्या भिंतींना जागोजागी भेगा पडल्या असून तो कधीही फुटू शकतो अशी शक्यता व चर्चा गावात शुक्रवारी रात्री होती. या चर्चेमुळे भयभीत झालेल्या गावकऱ्यांनी रातोरात आपले बस्तान जवळच्या गावाचा, मंदिरांचा आश्रय घेतला आहे.
पाटबंधारे विभागाने या तलावाकडे कधी फारसे लक्ष दिले नसल्याचे नागरिक सांगत आहेत. वृत्त लिहिस्तोवर पाटबंधारे विभागाचे अधिकारी राजू दामधोरे व पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र गायकवाड यांनी तलावकाठी भेट दिली आहे.