चौकटीबाहेरचा विचार परिचर्या व्यवसायास पोषक
By Admin | Updated: July 9, 2015 02:14 IST2015-07-09T02:14:26+5:302015-07-09T02:14:26+5:30
परिचर्या शिक्षकांनी भाविष्याचा वेध घेत चौकटीबाहेरचा विचार करावा. हे नवोन्मेषशाली विचारच परिचर्या व्यवसायाला भविष्यात प्रगतीपथावर नेतील, ....

चौकटीबाहेरचा विचार परिचर्या व्यवसायास पोषक
रामलिंग माळी : नर्सिंगच्या प्राचार्य संमेलनाचा समारोप
वर्धा : परिचर्या शिक्षकांनी भाविष्याचा वेध घेत चौकटीबाहेरचा विचार करावा. हे नवोन्मेषशाली विचारच परिचर्या व्यवसायाला भविष्यात प्रगतीपथावर नेतील, असे मत महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे अध्यक्ष रामलिंग माळी यांनी व्यक्त केले.
राधिकाबाई मेघे स्मृती परिचर्या विज्ञान महाविद्यालयाद्वारे सावंगीच्या दत्ता मेघे सभागृहात नर्सिंग प्राचार्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य समन्वयक डॉ. एस.एस. पटेल तर अतिथी म्हणून संस्थेचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या कुलसचिव मंगला आचन, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामचंद्र गोयल, परिचर्या विभाग संचालक सिस्टर टेसी सेबास्टीयन आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रसन्ना बेदी, शेटकर, रोझली मॅथ्यू, मंगला जोशी, गटकार्य समन्वयक डॉ. तृप्ती भट्टाचार्य, नर्सिंग समन्वयक मनीषा मेघे आदींचा सत्कार करण्यात आला.
डॉ. पटेल यांनी तंत्रज्ञानातील विकासाने दिलेली अत्याधुनिक स्वयंचलित उपकरणे रुग्णांच्या सेवेकरिता वापरताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्पर्शाचे महत्त्वचे लक्षात घेतले पाहिजे. ‘हायटेक’ होत असताना ‘हायटच’ही तितकाच मोठा उपचार आहे. तंत्रज्ञानाने परिचारकांच्या व्यावसायिक हस्तकौशल्यांवर अधिकार गाजवू नये, याची काळजी घ्यायला हवी. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक धोरणे ही प्रत्येक देशाच्या तळागाळातील व्यक्तीसाठी उपकारक असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अभ्युदय मेघे यांनी परिचर्या व लाभार्थी यांच्यात वाढत चाललेली दरी नष्ट करण्याचे कार्य संमेलनातील विचारमंथनातून झाले असून परिचर्या व्यवसायातील अपेक्षित बदलांसाठी प्राचार्यांची सभा एक महत्त्वपूर्ण सुरूवात आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन जया गवई यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार विशाल पाखरे यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)