अन्यथा शाळांवर होणार कारवाई
By Admin | Updated: December 10, 2015 02:21 IST2015-12-10T02:21:18+5:302015-12-10T02:21:18+5:30
शासनामार्फत सिगारेट व अन्य तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी लादण्यात आली आहे.

अन्यथा शाळांवर होणार कारवाई
वर्धा : शासनामार्फत सिगारेट व अन्य तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी लादण्यात आली आहे. या अनुषंगाने शाळा, महाविद्यालयापासून १०० यार्डच्या आतमध्ये तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवरही पायबंद घालण्यात आला आहे. या निर्णयाची अंबलबजावणी व्हावी म्हणून आता थेट शाळा, महाविद्यालयांवरच कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. ही कारवाई टाळण्यासाठी सिगारेट, तंबाखुजन्य पदार्थांची दुकाने शाळा, महाविद्यालय परिसरात आढळल्यास संबंधित संस्था चालक, मुख्याध्यापक व शिक्षकांनीच ते हटविणे गरजेचे झाले आहे.
शासनाने सिगारेट, तंबाखुजन्य पदार्थांच्या शाळा, महाविद्यालय परिसरात होणाऱ्या विक्रीवर बंदी घातली आहे. याबाबत संबंधित शिक्षक संस्थांना फलक लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. यावरून अनेक ठिकाणी फलक लागले तर काही शाळा, महाविद्यालयांत अद्यापही फलक दिसत नाही. यामुळेच कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तंबाखू वापरावर प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाने सिगारेट व अन्य तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००६ चे कलम अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. यानुसार शालेय संस्थेच्या आवारापासून १०० यार्डच्या आत तंबाखुजन्य उत्पादनाची विक्री करणे व शाळेत तंबाखुजन्य वातावरण तयार करणे, यावर कडक प्रतिबंध लावण्यात आलेत. असे केल्यास मुंबई पोलीस अधिनियम कलम ११६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.
ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार राज्यात २.५ कोटी लोक तंबाखूचा वापर करतात. जगात प्रत्येक वर्षी ५० लाख व भारतात अंदाजे १० लाख लोक तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांनी मृत्युमूखी पडतात. हृदयरोग, तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचे आजार तसेच इतर असंर्गजन्य रोगाचे कारण तंबाखुचा वापर आहे. तंबाखु सेवन करून थुंकल्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. शिवाय त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन कर्करोग, श्वसन, पुनरूत्पादन संस्था, पचनसंस्था आदी प्राणघातक आजारांची लागण होते.
तंबाखु, तंबाखुजन्य पदार्थापासून होणाऱ्या दुष्परिणामापासून मुक्त समाज निर्मितीसाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. यासाठी युवक, नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)