विद्यापीठ व शासनाच्या जाचक अटी : जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचितवायगाव (नि़) : नागपूर विद्यापीठात येणाऱ्या २५० महाविद्यालयांना विविध कारणांनी प्रवेश बंदचे आदेश देण्यात आले आहेत़ यात वर्धा जिल्ह्यातील महाविद्यालयांचाही समावेश आहे़ ग्रामीण भागातील महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली़ काही महाविद्यालयांत प्रवेश क्षमता कमी असल्याने असंख्य विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे़ वर्धा जिल्ह्यात ९७ महाविद्यालये आहेत़ शहरी भागात शाळा अधिक असल्या तरी विद्यार्थ्यांचा ओढाही अधिकच आहे. अनेक महा़चे प्रवेश पूर्ण झाल्याने उर्वरित विद्यार्थी कुठे जातील, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ नागपूर विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना पुर्वसूचना न देता २५० महाविद्यालयांना मागील वर्षी प्रवेश बंद करण्याचे आदेश दिलेत़ निर्धारित नियमानुसार वर्गनिहाय तुकडी वाढविली गेली तर वाढणाऱ्या तुकडीसाठी टप्प्याने १०० टक्के प्राध्यापकांची नियुक्ती झाली पाहिजे, ही अट आहे. पैकी ५० टक्के प्राध्यापक ५ आॅगस्टपूर्वी भरले पाहिजे तर उर्वरित ५० टक्के प्राध्यापक तीन महिन्यांच्या आत भरण्याचे आदेश आहेत़ या आदेशावर अंमल करण्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापणास कसरत करावी लागत आहे. प्राध्यापकांची नियुक्ती करताना नेट-सेट आणि पीएचडीधारक प्राध्यापकांना वेतन द्यायचे कुठून, असा प्रश्न संस्था व्यवस्थापकांना पडला आहे.व्यवस्थापनाने तात्पुरत्या स्वरुपात प्राध्यापकांची नियुक्ती केल्यास त्या शिक्षकांना तीन महिन्यानंतर रितसर समाविष्ट करता येईल; पण ५ ते १० हजारांत नेट-सेट, पीएचडीधारक प्राध्यापक मिळणार कुठे, हा प्रश्न संस्थांना आव्हान ठरत आहे़ प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वाजवी शुल्क घेणेही बंधनकारक केले आहे़ यामुळे प्राप्त शुल्कातूनही प्राध्यापकांना वेतन देणे शक्य नाही. या जाचक अटींमुळे महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेनुसारच प्रवेश घेतले जातील, अशी मानसिकता संस्थानिकांची आहे़ यामुळे अनेक विद्यार्थी अडचणीत आले आहेत़ ग्रामीण भागातील काही महाविद्यालये आदेशाचा मान ठेऊन बंद करण्यात आलीत़ याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. ग्रामीण भागातील विशेषत: मुलींना घरातील मंडळी शहरात शिक्षणासाठी पाठविण्यास तयार होत नाही़ यामुळे त्यांच्यावर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. बहुतांश विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमापासून वंचित राहणार आहे़ विद्यापीठाच्या निर्णयाचा फटका बसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात दिसते़(वार्ताहर)
२५० महाविद्यालयांना प्रवेश बंदचे आदेश
By admin | Updated: July 29, 2014 23:57 IST