पालिकेच्या साडेबारा कोटींच्या विकास कामांना ‘जैसे थे’चे आदेश
By Admin | Updated: June 2, 2016 00:47 IST2016-06-02T00:47:30+5:302016-06-02T00:47:30+5:30
पालिकेच्या वतीने होणाऱ्या तब्बल १११ विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी एका आदेशान्वये जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहे ...

पालिकेच्या साडेबारा कोटींच्या विकास कामांना ‘जैसे थे’चे आदेश
पालिकेला झटका : गैरकायदेशीर अट काढून टाकण्याच्या तक्रारीवर कार्यवाही
आर्वी : पालिकेच्या वतीने होणाऱ्या तब्बल १११ विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी एका आदेशान्वये जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहे ही सर्व विकासकामे साडेबारा कोटींची आहेत. या आदेशाने ही विकास कामे चर्चेत आली आहे.
आर्वी पालिकेच्यावतीने आर्वी शहर विकासासाठी साडेबारा कोटींची कामे करण्याची ई-टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानुसार आर्वी पालिकेने सर्व प्रक्रिया पार पाडली. यात टेंडर भरून संगणक प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. या टेंडरची ३१ मे ही अंतिम मुदत होती. परंतु आर्वी पालिकेने केलेली ही टेंडर प्रकिया विसंगत आहे. आतापर्यंत पालिकेची सर्व कामे १५ ते १७ टक्के बिलोने गेलेली असून या कामातून सामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.
मात्र यात सामान्य जनतेचा फायदा होऊ नये, यासाठी गैरअर्जदार आर्वी पालिकेचे मुख्याध्याधिकारी व न.प. अध्यक्षाने स्थायी समितीच्या ठरावात लोकविरोधी न्यायविसंगत गैरकायदेशीर टाकलेली अट वगळण्यात यावी व आर्वी पालिकेचा तो ठराव रद्द करावा, अशा आशयाची तक्रार काँग्रेसचे माजी नगरसेवक महादेव विश्वनाथ निखाडे यांनी जिल्हाधिकारी यांना केली होती. यात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देत संबंधीत टेंडर प्रक्रिया ही जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहे.
यात काही नोंदणीकृत कंत्राटदारांची नावे नोंदणीकृत करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आर्वी पालिकेने घेतलेल्या ठरावात १७ कंत्राटदारांची नावे यात टाकण्यात आली यात नगरविकास खात्याकडून अधिपत्र जाहीर केले नाही. यातून आर्वी पालिकेचे एक ते दीड कोटींचे नुकसान टाळता आले असते. अशा आशयाची तक्रार माजी नगरसेवक महादेव निखाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावर एका आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी सदर कामे जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)