पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषणला विरोध
By Admin | Updated: May 6, 2015 00:03 IST2015-05-06T00:03:06+5:302015-05-06T00:03:06+5:30
बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला.

पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषणला विरोध
संभाजी ब्रिगेडची शिवाजी पुतळ्याजवळ निदर्शने
वर्धा : बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. पुरंदरेंनी छत्रपती शिवरांयाचा खरा इतिहास दडपून बहुजन समाजामध्ये तेढ निर्माण करणे व मुस्लिम समुदायाला शत्रूपक्षात उभे करण्याचे आयुष्यभर काम केले. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करून पुरास्कारासह राज्याची शान घालवू नका, अशा तीव्र शब्दांत संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी निषेध नोंदविला. दरम्यान छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करून सरकारविरूद्ध घोषणाबाजी केली.
छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी जीवनचरित्रावर लेखन करण्याची मोठी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. शिवरायांच्या लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या विविध पैलूंवर सखोल संशोधन करून बहुजन समाजातील संशोधक नव्याने खऱ्या इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम समुदायाविरूद्ध उभे करून इतिहास लेखन केले, असा आरोप या संघटनांनी केला. त्यामुळे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास नव्या पिढीपुढे मांडण्यात त्यांचे कोणतेही योगदान नाही. राज्य शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर करून इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांना पाठबळ दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
या विरोधात संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य शासनाचा निषेध करून पुरंदरे यांना पुरस्कार देऊ नये, अशी मागणी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)